मराठी बिग बॉसची ४ थ्या सिजनची जशी सर्वत्र चर्चा आहे तशीच आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनची चर्चा देखील चर्चा रंगली आहे. याला कारणही तसेच खास आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा विजेता शिव ठाकरे आता हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजनमध्ये सहभागी झाला आहे. धमाल परफॉर्मन्स सादर करत त्याने हिंदी बिग बॉसच्या घरात ग्रँड एन्ट्री घेतली. हिंदी मालिकेतील नायिका, नायक, सोशल मीडिया स्टार अशा तब्बल १४ कलाकारांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली आहे. ज्यात मराठमोळा शिव ठाकरे सर्वांची मनं जिंकताना दिसला आहे. शिव ठाकरे या घरात तगडा सदस्य मानला जातो.
एम टीव्ही रोडिज या रिऍलिटी शोमध्ये सहभाग घेतल्यापासून शिव ठाकरे प्रेक्षकांचा आवडता बनला आहे. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनमध्ये विजेता ठरल्याने त्याला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. आता हिंदी बिग बॉसच्या घरात जाऊन शिव ठाकरे स्वतःला अधिक चांगला सदस्य असल्याचे कसे सिद्ध करून दाखवतो हे पाहावे लागेल. कारण हिंदी सृष्टीतील बरेचसे नामवंत कलाकार शोमध्ये सहभागी झाले आहेत. महत्वाचं म्हणजे फराह खानचा भाऊ बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान देखील सदस्य बनून दाखल झाला आहे. काही वर्षांपूर्वी मी टू प्रकरणात साजिदवर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे सहभागी सदस्य साजिद पासून काहीसे दूर राहण्याचा प्रयत्न नक्कीच करतील अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे.
हिंदी मालिका अभिनेत्री टीना दत्ता, रोडिज फेम शालीन भनोट, मिस इंडिया २०२० मान्या सिंह, भोजपुरी स्टार सौंदर्या शर्मा, अभिनेत्री निम्रत कौर अहलुवालिया. अंकित गुप्ता, प्रियांका चाहर चौधरी, इमली मालिका फेम सुम्बुल तौकिर खान, श्रीजिता डे, गौतम सिंह विग. राजस्थानची सपना चौधरी अशी ओळख बनवलेल्या गौरी नागोरी, गायक अब्दु रोजीक अशा एकूण १४ सदस्यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. काही दिवसांनी या घरात आणखी एका मराठी सेलिब्रिटीची वाईल्ड कार्ड एन्ट्री करण्यात येणार असल्याचे बोलले जाते. बिग बॉसच्या या घरातला सदस्यांचा पहिला दिवस अगदी मजेशीर गेलेला पाहायला मिळाला. हिंदी बिग बॉसचा १५ वा सिजन मराठमोळ्या तेजश्री प्रकाश हिने जिंकला होता.
या सिजनमध्ये अभिजित बिचुकले यांना देखील सदस्य बनण्याचा मान मिळाला होता. वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिजित बिचुकले यांना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले होते. घरातून बाहेर पडताच त्यांनी चक्क सलमान खानला चॅलेंज दिले होते. मराठी बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या सदस्यांना हिंदी बिग बॉसमध्ये आमंत्रित केले जाते. अर्थात मराठी प्रेक्षकांना या शो कडे खेचून आणण्यासाठीच हा घाट घातला जातो हे सर्वश्रुत आहे. आता शिव ठाकरे या सर्व सदस्यांना कशी टक्कर देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.