अपूर्वा नेमळेकर ही आभास हा या मालिकेतून सर्वप्रथम छोट्या पडद्यावर दिसली होती. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वातील शेवंता या भूमिकेमुळे अपूर्वा खरी घराघरात पोहोचली. मालिकेतील अण्णा नाईक आणि शेवंता पाटणकर ही जोडी खूपच गाजली. अपूर्वा वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्री असण्याबरोबरच ज्वेलरी डिझायनर देखील आहे. अपूर्वाज कलेक्शन या नावाने ती तिचा ज्वेलरी व्यवसाय देखील यशस्वीपणे सांभाळत आहे. बिग बॉसच्या बिग बॉस मराठी च्या चौथ्या पर्वामुळे अमृताने नेमळेकरची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून अपूर्वाच्या पहिल्या लग्नाबाबत देखील खूप चर्चा सुरू होती.
अपूर्वाचं पहिलं लग्न झालं होतं याची माहिती तिच्या बऱ्याच चाहत्यांना नाही. काही महिन्यांपूर्वी अपूर्वा तिच्या आईसोबत पर्यटनाला गेली होती. त्यावेळी तू लग्न कधी करणार? अशी आई सोबतच किती दिवस फिरणार? अशा कमेंट तिला नेटकऱ्यांनी केल्या होत्या. पण त्यावर अपूर्वा ने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अपूर्वा स्पर्धक म्हणून आल्यानंतर अपूर्वाच्या पहिल्या लग्नाबद्दलचं सत्य समोर आलं. रोहन देशपांडे यांच्यासोबत अपूर्वाचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ती वेगळी झाली. पण आता मात्र तिला पुन्हा लग्न करायचं आहे अशी इच्छा तिने बिग बॉसच्या घरात व्यक्त केली. नुकताच प्रदर्शित झालेला एपिसोड बघून अपूर्वाला नेमका कसा नवरा हवा हे तिच्या चाहत्यांना समजले आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात आल्यापासून अपूर्वा चांगल्या वाईट अशा दोन्ही कारणांमुळे चर्चेत आहे. कार्यक्रमाच्या पलिकडे खासगी आयुष्यातही अपूर्वा विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे. अपूर्वाच्या पहिल्या लग्नामध्ये तणाव निर्माण झाल्यानं ती विभक्त झाली. मात्र भविष्यात लग्न करायचं असल्याचं तिनं बिग बॉसच्या घरातील तिच्या मित्रांना सांगितलं. जेवणाच्या टेबलवर अक्षय, अपूर्वा आणि अमृता देशमुख बसलेले असताना तिघांनी लग्नाबद्दलचे विचार व्यक्त केले. अक्षय आणि अमृताला अपूर्वा सांगते की, माझ्या इतकी शांत मुलगी या घरात कोणीच नाही. तरीही मलाच सगळे बोलतात. त्यावर अक्षय तिला गमतीनं म्हणतो की, तुझं लग्नाचं वय झालं तरी अजून कोणी मुलगा कसा मिळाला नाही गं?
यावर अपूर्वा म्हणते की, मग काय करावं मी असं तुला वाटतं. आता असं काही लग्नाचं वय वगैरे नसतं अमृता म्हणाली. अपूर्वा अक्षयला म्हणते की, मला हवा तसा खजिना मिळालेला नाही. मी खजिना शोधत आहे पण अजूनही मला सापडत नाही. लग्न करण्यासाठी मुलाला कोणत्याच अटी घालणार नसल्याचंही अपूर्वा यावेळी म्हणते. आता खरंच अपूर्वा दुसरं लग्न करणार का? हे काही काळानंतर समोर येईलच. अमृता यावेळी म्हणते की मला काही खजिना वगैरे नकोय मला फक्त बॉक्स हवा आहे. या तिघांच्या संभाषणावरून आता अपूर्वा दुसऱ्या लग्नाचा विचार करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता तिच्या इच्छेनुसार तिला जोडीदार मिळू दे अशी आशा चाहते करत आहेत.