गेल्या वर्षी गणेशोत्सवात आमच्या पप्पाने गंपती आणला हे गाणं सोशल मीडियावर खूपच व्हायरल झालं होतं. साइराज केंद्रे या चिमुरड्याने या गाण्यावर एक छोटासा रील बनवला होता. शाळेच्या गणवेशात असलेला साइराज आणि त्याचे कमाल एक्सप्रेशन्स पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं होतं. पण साइराजमुळे या गाण्याचे खरे कलाकार कोण आहेत हे लोकांच्या समोर आले होते. खरं तर हे गाणं मंगेश घोरपडे आणि मनोज घोरपडे यांनी मिळून तयार केलं होतं. बालगायक माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या चिमुरड्यानी हे गाणं गायलं होतं.
साइराज नंतर तेवढीच प्रसिद्धी या दोन्ही बालगायकाना मिळायला हवी होती अशी मागणी प्रेक्षकांनी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मंगेश घोरपडे आणि हे चिमुरडे गायक मीडियामाध्यमातून प्रसिद्धी मिळवताना दिसले. मंगेश घोरपडे यांचा वडापाव विक्रीचा छोटासा व्यवसाय आहे. व्यवसाय सांभाळत ते कलेचीही आवड जोपासताना पाहायला मिळतात. गणपतीवरील या गाण्याला लोकप्रियता मिळण्या अगोदर त्यांनी आणखी काही गाणी सोशल मीडियावर शेअर केली होती. पण त्यातील माऊली आणि श्रेयाने गायलेल्या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळू लागली. पण आता या हिट गाण्यानंतर माऊली आणि श्रेया घोरपडे यांचं आणखी एक गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या समोर आलं आहे. लवकरच शिमगोत्सव साजरा करण्यात येत आहे.
कोकणात या सणाला खूप मोठे महत्व आहे. त्यामुळे माऊली आणि शौर्याने गायलेल शिमग्यावरचं हे गाणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. पप्पा चल पप्पा चल गावाला जाऊ शिमग्यात ढोल पालखी खांद्यावर घेऊ, हे गाणं शौर्या आणि माऊली या दोघांनी गायलं आहे. सागर नवले आणि सचिन धुमक यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर या गाण्यात दोन्ही बालगायकाना झळकण्याची संधी मिळाली आहे. शौर्याचे बोबडे बोल या गाण्यातही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचमुळे या गाण्याला सोशल मीडियावर चांगली लोकप्रियता मिळू लागली आहे. भविष्यात शौर्या आणि माऊली घोरपडे संगीत क्षेत्रात त्यांचं नाव नक्कीच लौकिक करतील अशीच चिन्ह आतापासूनच दिसू लागली आहेत. या दोन्ही बालगायकाना त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.