अभिनेता शशांक केतकर आपली मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असतो. सध्या स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेतून तो प्रमुख भूमिका साकारत आहे. सामाजिक प्रश्नांवर शशांक नेहमी व्यक्त होत असतो. एटीएममध्ये अस्ताव्यस्त पडलेला कचरा असो किंवा बसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर पुरुष मंडळी बसतात. तेव्हा तो आपले मत परखडपणे मांडतो. हे मन बावरे या मालिकेत तो काम करत असताना मंदार देवस्थळी यांनी आमचे पैसे थकवले असा खुलासा त्याने मालिका संपल्यानंतर केला होता.
शशांक सह शर्मिष्ठा राऊत आणि मृणाल दुसानिस यांनीही याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. मात्र अजूनही आमचे पैसे मिळाले नसल्याचे शशांकने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा माझी फसवणूक झाली असल्याचे शशांकने म्हटले आहे. एका चित्रपटात काम केल्यानंतर अजूनही निर्मात्याने माझे काही लाख रुपये दिले नसल्याचे त्याने पोस्टद्वारे सांगितले आहे. त्यावर सेलिब्रिटींनीही आश्चर्यकारक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल शशांक म्हणतो की, मला आणखी एका फसव्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्याचा संधी मिळाली. त्यांनी माझ्या कामासाठी काही लाख रुपये देण्याचे कबूल केले जे काम डबिंग वगळता मी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण केले आहे.
बरेच महिने मी प्रोडक्शन हाऊसचा पाठपुरावा करत आहे आणि ते लोक मला प्रत्येक वेळी बहाणे देत टाळाटाळ करत आहेत. हा एक मराठी चित्रपट आहे ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावे आहेत. त्या बड्या स्टार्सना त्यांच्या कामाची ठरलेली रक्कम आधीच देण्यात आली आहे. पण मला आणि टीममधील इतर अनेकांना पहिले २० टक्के फी देखील मिळालेली नाही. माझ्या आणि निर्मात्यांमध्ये घडलेला सर्व तपशील आणि सर्व संवाद योग्य क्षणी बातम्या आणि मीडिया चॅनेलवर शेअर केला जाईल. गमतीचा भाग हा आहे की एखाद्याकडे अभिनय कौशल्य नसते तर त्याला आपण अभिनेता म्हणत नाही. मग ज्याच्याकडे पैसा नाही त्याला आपण निर्माता म्हणतो. निराशा आणि पुन्हा एकदा फसवणूक झाली म्हणत शशांक याबद्दल लवकरच सविस्तर माहिती देणार आहे.