भारतीय क्रिकेट टीमचा ऑलराऊंडर शार्दूल ठाकूर याने आज साखरपुडा केला आहे. मुंबईत शार्दूल ठाकूर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर यांनी आज सोमवारी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी एंगेजमेंट केली आहे. मोठ्या थाटात पार पडलेल्या ह्या सोहळ्याला त्यांनी मोजक्याच मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शार्दूल ठाकूर मितालीला डेट करत होता. त्यानंतर आज त्यांनी साखरपुडा केल्याचे इंस्टावर सांगितले आहे.
खेळपट्टीवर जोरदार फटकेबाजी करण्यात तरबेज आणि आक्रमक वेगवान स्विंग गोलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या शार्दुल ठाकूरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाकूर आणि धवल कुलकर्णीच्या धुव्वाधार बॅटिंगने एकत्र येऊन फेब्रुवारी २०१६ मध्ये मुंबईला रणजी करंडक विजेतेपद पटकावून दिले होते. विशेष म्हणजे शार्दुलने सौराष्ट्र विरुद्धच्या अंतिम सामन्यात निर्णायक आठ विकेट्स घेतल्या होत्या. शार्दुलची क्रिकेट दुनिया शालेय जीवनापासून सुरु झाली होती. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कुल बोरिवली येथील सामन्यात युवराज सारखा सहा चेंडूत सहा षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला होता. येथूनच त्याचा रणजी क्रिकेट जगतात प्रवेश निश्चित झाला. आजवर भारतीय क्रिकेट टीमसाठी त्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. शार्दूलच्या या यशस्वी प्रवासमागे त्याची मेहनत खूप महत्त्वाची आहे. न्यूजिलँड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतून शार्दूल ठाकुरला विश्रांती देण्यात आली आहे. आज झालेल्या साखरपुड्याच्या बातमीने शार्दूलच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे.
साखरपुड्याचे त्यांचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. २०२२ साली ऑस्ट्रेलियात ICC क्रिकेट मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप आयोजित होत आहे. हे सामने पूर्ण झाल्यावर शार्दूल मिताली सोबत लग्न गाठ बांधणार असल्याचे ट्विटरवर जोरदार चर्चा रंगली आहे. मूळचा पालघरचा असलेला शार्दूल मुंबईला जाण्यासाठी रोजचा प्रवास ट्रेनने करायचा. ह्या खडतर प्रवासात अनेक धक्के खात तो भारतीय क्रिकेट टीम मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करताना दिसत आहे.