काल सोमवारी ठरलं तर मग या मालिकेचा २०० वा भाग प्रसारित करण्यात आला. यानिमित्ताने मालिकेची सर्व टीम सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेली होती. यावेळी मालिकेचे निर्माते सुचित्रा, आदेश बांदेकर आणि त्यांचा मुलगा सोहम बांदेकर हे देखील उपस्थित होते. ठरलं तर मग ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेत सायलीने पूर्णा आजीचे मन जिंकून घेतले आहे. त्यामुळे आता पूर्णा आजी सायली आणि अर्जुनचे लग्न लावण्याचा घाट घालत आहेत. खरं तर सायली आणि अर्जुनचे काँट्रॅक्ट मॅरेज असून स्वतःच्या स्वार्थासाठी हे लग्न केलं आहे.
मात्र आता आजीच्या या भूमिकेमुळे दोघेही अडचणीत सापडणार आहेत. सायली आणि अर्जुन या लग्नाला तयार होणार की नाही हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तूर्तास या मालिकेतील सुमन काकीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत तन्वीच्या काकीची भूमिका अभिनेत्री श्रद्धा केतकर वर्तक यांनी साकारलेली आहे. श्रद्धा वर्तक या गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. मधल्या काळात मुलाच्या जन्मानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. चार चौघी, आंबट गोड, एक डाव भटाचा अशा सिनेमा, नाटकातून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. ठरलं तर मग मालिकेतील त्यांची भूमिका सकारात्मक असल्याने प्रेक्षकांना ही भूमिका विशेष भावली आहे.
श्रद्धा या प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असलेल्या संचित वर्तकच्या पत्नी आहेत. संचित हा विनोदी अभिनेता म्हणून झळकला होता. मात्र पुढे जाऊन दिग्दर्शन क्षेत्रात त्याने आपले पाऊल टाकले. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून त्याने अनेक हॉलिवूड चित्रपट, कार्टून कॅरॅक्टर्सना आवाज दिला आहे. या क्षेत्रात त्याने चांगला जम बसवलेला पाहायला मिळतो. मराठी इंडस्ट्रीतील मेघना एरंडे, उदय सबनीस हे नाव या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जोडीला संचितने देखील मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आज श्रद्धा यांच्या वाढदिवस निमित्ताने संचितने शुभेच्छा देणारी खास पोस्ट शेअर केली आहे. ठरलं तर मग मालिकेत श्रद्धा वर्तक यांनी साकारलेली सुमनची भूमिका खास आहे. या भूमिकेसाठी आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा.