मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या लेकीने आकाशाला गवसणी घालत पायलट बनण्याचे स्वप्न साकार केलं आहे. शरद पोंक्षे यांची लेक सिद्धी ही गेल्या वर्षी प्रोफेशनल पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी परदेशात गेली होती. आज लेकीचं जे स्वप्न पूर्ण झाल्याचे पाहून शरद पोंक्षे यांनी तीच अभिनंदन केलं आहे. शरद पोंक्षे गेल्या चार वर्षांपूर्वी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र असे असतानाही सिद्धी हॉस्पिटलमध्ये बसून तिचा बारावीचा अभ्यास पूर्ण करत होती. अशा कठीण काळातही सिद्धीने बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळवले होते.
कॅन्सरच्या आजाराने आर्थिक संकट ओढवले असतानाही सिद्धीने मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन केले. आपल्या लेकीचं हे कौतुक करताना शरद पोंक्षे म्हणतात की, “कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून, माझं आजारपण, आर्थिक स्थिती बिकट म्हणून बॅंकेचं कर्ज काढून हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत, आरक्षण नसताना केवळ मेहनत, बुध्दीमत्ता, परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली. बापाला आणखी काय हव नाही का? आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी. मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे. करशीलच खात्रीच आहे. लव यू बाळा”.
शरद पोंक्षे यांनी आपल्या लेकीचे काही फोटो शेअर केले आहेत आणि त्यात ती पायलट बनली असे म्हटले आहे. त्यावर आता मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी सिद्धीचं मोठं कौतुक करत तिचं अभिनंदन केलेलं आहे. आपल्या लाडक्या लेकीने आता तिचं स्वप्न पूर्ण केलंय त्यामुळे पुढे आता तिने देशसेवा करावी अशी शरद पोंक्षे यांची इच्छा आहे. मराठी सृष्टीतील अलका कुबल यांच्या लेकीनेही आकाशाला गवसणी घालत पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. त्यानंतर आता शरद पोंक्षे यांची लेक सुद्धा पायलट झाली आहे. त्यामुळे मराठी कलाकारांची मुलं आता वेगळ्या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार करू लागले आहेत. अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यापेक्षा त्यांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्यासाठी ते आता हळूहळू पाऊल उचलू लागले आहेत. ही मराठी प्रेक्षकांसाठी सुद्धा कौतुकाची बाब म्हणावी लागेल.