रंगभूमीवरील सुवर्ण युगाचे साक्षीदार ज्येष्ठ अभिनेते गायक पंडित रामदास कामत यांचे शनिवारी ८ जानेवारी २०२२ रोजी ९.४५ वाजता विलेपार्ले येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले आहे. रामदास कामत हे ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे त्यांचा मुलगा डॉ कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत, नातू अनिकेत कामत आणि नातसून भाव्या असा परिवार आहे. अंधेरी येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. संगीत नाटकांमधून रामदास कामत यांनी काम केले होते.
रामदास कामत हे मूळचे गोव्याचे वडीलबंधु उपेंद्र यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले होते. याशिवाय नाट्य संगीताचेही त्यांनी धडे गिरवले होते. पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडीत गोविंद बुवा अग्नी यांचा सहवास त्यांना लाभला होता. ‘पूर्वेच्या देवा तुझे’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘गुंतता हृदय हे’, ‘श्रीरंग कमला कांता’, ‘देवा तुझा मी सोनार’ अशी शेकडो लोकगीत, भावगीत, चित्रपट गीत आणि नाट्यपदे त्यांनी गायली होती. एअर इंडियाची नोकरी सांभाळून त्यांनी सांगीतिक कारकिर्दीची ६० वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली होती हे विशेष. या काळात गोपीनाथ सावकार कला मंदिर, रंगशारदा, भरत नाट्यमंदिर अशा विविध नाट्यसंस्थेशी ते जोडले गेले होते. ‘संगीत मत्सगंधा’ हे त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक होतं. नाटकातील नाट्यपदे देखील खूप गाजली होती.
संगीत एकच प्याला, संगीत सौभद्र, संगीत होनाजी बाळा, संगीत स्वरसम्राट अशा अनेक संगीत नाटकांमधून त्यांना झळकण्याची संधी मिळाली होती. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत बालगंधर्व पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, छोटा गंधर्व पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जितेंद्र अभिषेकी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पंडित रामदास कामत यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची खंत जाणत्या कलाकारांनी व्यक्त केली आहे. पंडित रामदास कामत यांना कलाकार इन्फोच्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.