मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील बराच काळ अनुभवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील परळ येथील निवासस्थानी वत्सला देशमुख यांचे निधन झाले आहे त्या ९२ वर्षांच्या होत्या. वत्सला देशमुख यांची मुलगी म्हणजेच मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना होय. रंजनाने शिकून खूप मोठं व्हावं अशी वत्सला देशमुख यांची इच्छा होती. मात्र रंजनाची पाऊले अभिनय क्षेत्रातकडे वळली आणि या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेला पाहायला मिळाला. वत्सला देशमुख यांचे वडील देखील नाटकात काम करत असत. त्यामुळे संध्या आणि वत्सला या दोघी बहिणींनी देखील बालपणापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती.
पुढे हिंदी चित्रपटातून दोघी बहिणींना एकत्रित झळकण्याची संधी मिळाली. नवरंग, बाळा गाऊ कशी अंगाई, लडकी सह्याद्री की, तुफान और दिया, फायर, नागपंचमी, जल बिन मछली नृत्य बिन बिजली अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटातून काम केले. पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक यशस्वी चित्रपट म्हणून मानला जातो. या चित्रपटात संध्या शांताराम यांनी मुख्य भूमिका साकारली होती तर वत्सला देशमुख यांनी अक्काची भूमिका निभावली होती. वत्सला देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. रंजनाच्या निधनानंतर त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या.काही वर्षांपूर्वी वत्सला देशमुख यांनी मुलाखत दिली होती त्यावेळी रंजनाच्या आठवणीत त्या खूपच भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या.
चित्रपटात काम करण्याबाबत त्या म्हणाल्या होत्या की, आता ह्या वयात मला कोण काम देणार. जय शंकर या हिंदी चित्रपटातून वत्सला देशमुख यांनी काम केले होते हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट ठरला. ह्या चित्रपटात रंजना बाल कलाकाराच्या भूमिकेत पहिल्यांदा झळकली होती. त्यावेळी रंजना अवघी तीन ते चार महिन्यांची होती. या चित्रपटात वत्सला देशमुख रावणाच्या आईच्या भूमिकेत होत्या. रंजना लहान असल्याने त्या तिला सोबत घेऊन जायच्या. एकदा एका सीनमध्ये वत्सला यांच्या हातात लहान मूल दाखवायचे होते. त्यावेळी रंजनालाच त्यांनी आपल्या हातात घेतले होते अशी आठवण त्यांनी या मुलाखतीत सांगितली होती. त्यांच्या निधनाच्या बातमीने मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.