Breaking News
Home / मराठी तडका / ५ महिन्यांपूर्वी जीवघेण्या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीचे पुनरागमन
ranjai movie varsha dandale

५ महिन्यांपूर्वी जीवघेण्या अपघातातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीचे पुनरागमन

साधारण पाच महिन्यांपूर्वी मालिका चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती याशिवाय मणक्याला देखील मार लागला होता त्यामुळे वर्षा दांदळे यांना हालचाल देखील करणे अगदी अशक्य होते. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या या जीवघेण्या अपघातातून त्यांच्या मानेचे दोन मणके निखळून पाठीच्या कण्याला लागत होते. ते पुन्हा सुस्थितीत करणे खूपच कठीण काम होते. अशा परिस्थितीत १० पैकी ३ पेशंट वाचण्याची शक्यता असते. तर काही जण कोमामध्ये जातात तर काही जण हे जग सोडून जातात असे डॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र गेल्या काही महिन्यांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळालेले दिसून आले.

actress varsha dandale
actress varsha dandale

अर्थात प्रचंड इच्छाशक्ती आणि जगण्याच्या उमेदीमुळे या गंभीर दुखापतीतून वर्षा दांदळे यांनी स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने वर्षा दांदळे यांनी हलकासा व्यायाम करण्यास सुरुवात केली होती यामुळे त्यांना चालताही येऊ लागले होते. आता या दुखापतीतून पूर्णपणे बऱ्या होऊन वर्षा दांदळे पुन्हा एकदा मराठी सृष्टीत पुनरागमन करताना दिसत आहेत. निसर्ग फिल्म प्रस्तुत ‘रानजाई’ या चित्रपटात वर्षा दांदळे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सुरू करण्यात आले आहे. दिग्दर्शक राजन बने रानजाई या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वर्षा दांदळे या बृहन्मुंबई महानगरपालिकेत संगीत शिक्षिकेची नोकरी करत असत.

ranjai movie varsha dandale
ranjai movie varsha dandale

इथूनच त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. प्रेक्षकांना त्यांच्या नाटकातील भूमिका खूप आवडू लागल्या. पुढे झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी आत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली होती. शिवाय वच्छी आत्या लग्न जुळवुन देते म्हणून खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्यांच्याकडे लग्न जुळवून देण्यासाठी पत्रिका आणून दिल्या होत्या. १९९९ साली त्यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. २००५ साली वच्छी आत्याच्या भूमिकेने त्यांचे या क्षेत्रात येणे सार्थकी ठरले.

पुढे नकटीच्या लग्नाला यायचं हं या मालिकेत लता काकू. घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ आणि मलवणी डेज मधली मालवणी काकू. पाहिले न मी तुला मधील उषा मावशी अशा अनेक भूमिका त्यांनी आपल्या सजग अभिनयाने गाजवल्या होत्या. निसर्ग फिल्म्स प्रस्तुत रानजाई या आगामी चित्रपटातून त्यांना अशीच एक भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. रानजाई या आगामी चित्रपटासाठी आणि पुनःपदार्पणासाठी वर्षा दांदळे यांना खूप खूप शुभेच्छा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.