हिंदी सृष्टीत अनेक मराठी कलाकार आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसतात. सुलोचना लाटकर, ललिता पवार, निवेदिता सराफ ते अलीकडे सई रानडे, क्षिती जोग ही कलाकार मंडळी हिंदी सृष्टीचा एक ओळखीचा चेहरा बनली आहेत. अशातच हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून आजीच्या भूमिका गाजवणारा आणखी एक चेहरा म्हणजे सुनीता शिरोळे यांचा. १३ जानेवारी १९३६ रोजी नागपूरच्या एका सर्वसाधारण मराठी कुटुंबात सुनीता शिरोळे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वे खात्यात नोकरीला होते. सुशीला देशमुख हे त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. त्यांनी एमए ची पदवी प्राप्त केली होती. लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रमातून त्या सहभागी होत.
कॉलेजमध्ये असतानाही त्यांनी नाटकातून काम केले होते. दरम्यान काही काळ त्यांनी कॉलेजमध्ये शिकवण्याचे काम केले. याच कॉलेजमध्ये रमेश शिरोळे हे इतिहास विषय शिकवत होते. त्यांचे मोठे भाऊ जयकृष्ण शिरोळे हे उदयपूरमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षक होते. त्यांच्याच मार्फत जयकृष्ण आणि सुनीता यांची ओळख झाली. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. जयकृष्ण शिरोळे यांचे वडील वर्धाच्या एका श्रीमंत कुटुंबापैकी एक होते. पोलीस महानिरीक्षक पदाची निवृत्ती स्वीकारून ते मुंबईला स्थायिक झाले होते. मफतलाल मिल्समध्ये ते सल्लागार म्हणून कामकाज पाहत होते. जयकृष्ण यांनीही आपल्या शिक्षकाच्या नोकरीला राम राम ठोकला आणि मफतलाल मिलमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणार होते. पण जयकृष्ण शिरोळे यांच्याशी लग्न झाले तसे सासऱ्यांनी त्यांना घराबाहेर काढले.
कारण त्यांच्या ब्राह्मण कुटुंबात सुनीताचे येणे मान्य नव्हते. १९६२ साली लग्नानंतर या दोघांनी थेट दिल्ली गाठली. दरम्यान सुनीता यांनी शिक्षिकेची नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटी आकाशवाणीसाठी मराठी बातम्या सांगण्याचे त्यांनी काम केले. श्रीराम फर्टीलायझर्स कंपनीत बराच काळ त्यांनी असिस्टंट मॅनेजर पदाची नोकरी केली. याचदरम्यान जयकृष्ण शिरोळे यांनीही उषा शिलाई मशीन कंपनीत मार्केटिंगचे काम केले. पुढे दोघांनी १९९५ साली निवृत्ती स्वीकारली. नोकरी करता करता सुनीता यांनी नाटकातून सुद्धा काम केले होते. यातून मिळणारे सगळे पैसे त्या प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी घालवत. निवृत्तीनंतर या दोघांनी एक बिजनेस सुरू केला. पण एक दिवस त्या गोदामाला भीषण आग लागली आणि होत्याचं नव्हतं झालं. या आगीत त्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं.
जेवढी प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली होती ती सगळी त्यांना विकावी लागली होती. केवळ राजेंद्रनगर इथे त्यांचं जुनं घर शिल्लक राहिलं होतं. अशातच २००३ साली त्यांच्या नवऱ्याचेही निधन झाले. त्यानंतर पुन्हा एक नवीन सुरुवात करण्यासाठी सुनीता मुंबईला आल्या. इथे आल्यानंतर त्यांनी चित्रपट मालिकेतून आजीच्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. बजरंगी भाईजान, शापित, दो दुनि चार, किसना अशा चित्रपटातून काम केले. त्यांची दोन्ही मुलं दिल्लीला स्थायिक आहेत, मात्र सुनीता शिरोळे एकट्या मुंबईला राहतात. मागील दोन तीन वर्षातील संकटात त्यांनी आपल्या जवळचे पैसे खर्चासाठी वापरले पण त्यानंतर मात्र शरीरानेही साथ सोडली. किडनीच्या त्रासाने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण जवळ पैसेच नसल्याने मदत मागण्याचे ठरवले. अशातच सिंटा कडून त्यांना आर्थिक मदत मिळाली. पण अजूनही व्हीलचेअरवर बसून त्या जाहिरातीतून काम करण्याचा प्रयत्न करतात.