जेष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचे वयाच्या ७० व्या वर्षी वृध्दापकालाने दुखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. आज शनिवारी २२ जानेवारी रोजी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने कला विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कीर्ती शिलेदार यांचे आईवडील दोघेही अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार या कलाकार दाम्पत्यास दोन मुली कीर्ती शिलेदार आणि लता शिलेदार (दीप्ती भोगले). जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांनी मराठी रंगभूमीची स्थापना केली होती.
तमाशातल्या मैने पासून ते शास्त्रीय संगीत पर्यंतच्या गायनाच्या अनेक छटा किर्ती शिलेदार यांनी यशस्वीपणे सादर केल्या. या संस्थेमार्फत अनेक संगीत नाटकांना पुनरुज्जीवन मिळाले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांच्या मुलीने म्हणजेच कीर्ती शिलेदार यांनी संगीत कलेची जोपासना केली. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षांपासूनच त्या संगीत नाटकातून काम करत असत. शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण त्यांनी निळकंठ बुवा अभ्यंकर यांच्याकडून घेतले होते. पुणे विद्यापीठातुन त्यांनी साहित्य शाखेची पदवी प्राप्त केली होती. अभोगी, एकच प्याला, कान्होपात्रा, ययाती आणि देवयानी, विद्याहरण, शाकुंतल, संशयकल्लोळ अशा गाजलेल्या संगीत नाटकांमधून त्यांनी अभिनय साकारला होता.
आपल्या कारकिर्दीत ६० हुन अधिक वर्षे त्यांनी संगीत आणि रंगभूमीची सेवा केली. २०१८ साली ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद यांनी भूषविले होते. त्यांनी संगीत नाटक परंपरेसाठी मोठे योगदान दिले होते. संगीत नाटक म्हणजे आपला श्वास मानणाऱ्या कीर्ती शिलेदार यांनी साकारलेल्या अनेक साध्या आणि तितक्याच सोज्वळ भूमिका प्रेक्षकांच्या संस्मरणीय ठरल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीची आराधना खंडित झाली आहे अशीच भावना व्यक्त केली जात आहे. संगीत नाटकांना बहुमान मिळवून देणाऱ्या कीर्ती शिलेदार यांना आमच्या संपूर्ण टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली!