Breaking News
Home / ठळक बातम्या / ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे निधन.. दर्जेदार भूमिकांमुळे मिळाली होती ओळख
mohandas sukhtankar
mohandas sukhtankar

ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे निधन.. दर्जेदार भूमिकांमुळे मिळाली होती ओळख

ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखटणकर यांचे आज ६ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले, ते ९३ वर्षांचे होते. अंधेरी येथील राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. मोहनदास सुखटणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून बाजूला होते. मात्र सोशल मीडियावर ते कायम सक्रिय असायचे. रायगडाला जेव्हा जाग येते, लेकुरे उदंड जाहली अशा दर्जेदार नाटकांमधून त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मोहनदास सुखटणकर यांच्या जाण्याने मराठी सृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मोहनदास सुखटणकर हे मूळचे गोव्याचे होते.

mohandas sukhtankar
mohandas sukhtankar

मात्र शिक्षणासाठी ते मुंबईत दाखल झाले. दि गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. अंमलदार, अखेरचा सवाल, लग्नाची बेडी, वेड्यांचा चौकोण अशा नाटकांमधून त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनयाचा छंद हा छंद पुढे भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू नये म्हणून मोहनदास सुखटणकरांनी एलआयसीत नोकरी केली होती. १९९० साली ते एलआयसीतून निवृत्त झाले तरी रंगभूमीसाठी काम करणे त्यांनी सोडले नव्हते. काही दिवसांपूर्वीच हास्य जत्रा फेम समीर चौघुले यांना त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. समीरने सुखटणकरांचे कौतुक करताना म्हटले होते की, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मी मोहनदास काका सुखटणकर यांच्या घरी जाऊन त्यांचे आशिर्वाद घेण्याचा योग आला.

mohandas sukhtankar family
mohandas sukhtankar family

९३ वर्षांच्या या तरुणाने आजवर रंगभूमीवर केलेलं कार्य, काम, किस्से प्रत्यक्ष त्यांच्या मुखी ऐकणे हे अत्यंत आनंददायी होतं. मोहनकाका “महाराष्ट्राची हास्यजत्रा” नियमित बघतात आणि त्यांना माझे काम खूप आवडते हे त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आमच्या दूरध्वनी वरील संभाषणात सांगितले होते. भेटायचा योग मात्र माझ्या कार्यबाहुल्यामुळे येत नव्हता, पण एक दिवस त्यांचा दूरध्वनी आला. “समीर अरे ९३ वर्षांचा आहे रे मी. तुला येऊन भेटायची इच्छा खूप आहे, पण शक्य होत नाही रे” कुठेतरी आत चर्रर्र झालं. गेले काही महिने थोडा वेळ ही काढता न यावा इतकं ही मोठ काम मी नक्कीच करत नसल्याची जाणीव झाली. स्वतःचाच राग आला आणि त्याच दिवशी मोहनकाकांना त्यांच्या अंधेरीच्या घरी जाऊन भेटून आलो. मला भेटल्यावर मोहन काकांनी मला घट्ट मिठी मारली.

त्यांच्या मिठीत वडीलकीची माया, थरथर आणि डोळ्यात आसवं होती. मला ही क्षणभर भरून आल त्यांनी काठी टेकवत एखाद्या मोठ्या सत्कारमूर्तीचा करतात तसा शाल श्रीफळ देऊन माझा सत्कार केला. मी वाकून नमस्कार केला. मला सुरकुत्या पडलेल्या हातांनी भरभरून आशिर्वाद दिले. मला म्हणाले “तुझं आणि माझं दैवत एकच चार्ली चॅप्लिन. तू केलेला चार्ली चॅप्लिन बघितला तेव्हापासून तुला भेटायची इच्छा होती. तू आत्ता ज्या जागेवर बसला आहेस ना त्या जागी काही वर्षांपूर्वी “वपु” बसून गेले आहेत. विंदा बसून गेले आहेत, पुल भाई बसले होते,” मला काय react व्हावं तेच कळेना. पुढचा अर्धा तास मी मोहन काकांचे किस्से, त्यांच्या संगीत नाटकांच्या आठवणी, त्या काळची दैवी माणसे याबद्धल फक्त ऐकत होतो आणि साठवत होतो.

फोनवर त्यांच्या ऐकलेला थकलेला आवाज त्या क्षणी गायब झाला होता. एक तुकतुकीत कांतीचा विलक्षण प्रतिभा असलेला एक तरुण माझ्या समोर मला दिसत होता. अनुभवाने, आपल्या कामाने पर्वताहून मोठ्या असलेले हे रंगकर्मी अत्यंत खुल्या दिलाने माझं कौतुक करत होते. मोहन काकांना भेटून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे या पिढीची आपल्या कामावर असलेली निष्ठा. काकांना भेटून एक गोष्ट मी अक्षरशः लुटली ती म्हणजे “समाधान”. तुम्हाला कधी ही जुनेजाणते रंगकर्मी दिसले तर आवर्जून त्यांना भेटायला जा त्यांची चौकशी करा, त्यांना किंचित nostalgic होऊ द्या.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.