माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला आता रंजक वळण मिळाले आहे. लवकरच नेहा यशला प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. मागील काही भागांमध्ये मिथिला काकूंनी यशसाठी सूनयनाचे स्थळ सुचवले होते. मात्र सूनयनाला एक मुलगा असून ती घटस्फोटीत आहे. असे समजताच जगन्नाथ चौधरी म्हणजेच यशच्या आजोबांनी तिला नकार देण्याचे ठरवले. मात्र यश आणि नेहाचं लग्न व्हावं, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या आजोबांना परिबाबत अजूनही काही कल्पना नसते. नेहाला मुलगी आहे ही बाब आजोबांना कळायला हवी असा विचार समीरने केलेला असला तरी परीबाबत आजोबांना समजल्यावर ते नेहाला नातसून म्हणून स्वीकारणार की नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर मालिकेतून लवकरच उलगडणार आहे.
तूर्तास जग्गु आजोबांबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत जगन्नाथ चौधरीच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली आहे. वेळप्रसंगी कणखर राहून निर्णय घेणारे जग्गु आजोबा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. मोहन जोशी यांनी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुरुवातीला बहुतेकदा त्यांच्या वाट्याला खलनायकी ढंगाच्याच भूमिका आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मोहन जोशी यांनी १९६६ साली इयत्ता सहावीत असताना नाटकात भूमिका साकारली होती. पुढे बीकॉमचे शिक्षण झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून त्यांनी पुण्यातील किर्लोस्कर कंपनीत नोकरी केली.
पण नाटकाच्या दौर्यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि ते मिळणे अशक्य होऊ लागले. तेव्हा शेवटी नोकरी किंवा नाटक यापैकी एक गोष्ट निवडायची असा विचार करून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ज्योती जोशी यांच्याशी मोहन जोशींचे लग्न झाले आणि ते त्यांना घेऊन आपल्या अभिनय कारकिर्दीसाठी मुंबईत आले. कुर्यात् सदा टिंगलम् हे मोहन जोशी यांचे पहिले व्यावसायिक रंगभूमीवरील नाटक. पुढे नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती, त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन त्यांनी आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले. अभिनयाच्या क्षेत्रात कुणी गॉडफादर नव्हता. नाटकातून काम करत असल्याने एक डाव भुताचा या चित्रपटात पहिल्यांदा झळकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली होती.
पुढे अशाच धाटणीच्या भूमिका रंगवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी ही अगदी चोख बजावली. खलनायकी भूमिका नंतर चरित्र भूमिकांमध्ये ते जास्त रमले. देऊळ बंद चित्रपटातील त्यांनी साकारलेले स्वामी समर्थ प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांनी मिळून गौरीनंदन थिएटर्स नावाची नाट्यसंस्था काढली. गौरी आणि नंदन ही दोन अपत्ये त्यांना आहेत. या निर्मिती संस्थेतून गजरा, मनोमनी, गाढवाचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई अशा नाटक आणि टीव्ही मालिकांची निर्मिती तसेच सीडीज त्यांनी बाजारात आणल्या होत्या. मोहन जोशी यांचा मुलगा नंदन जोशी याने एन जे डिझाइन ग्रुप ही संस्था उभारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो इंटेरिअर डिझाईन क्षेत्रात कार्यरत आहे.