कालच ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीवर शोककळा पसरली होती. तर आज पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांच्या निधनाची बातमी समोर आलेली पाहायला मिळते आहे. मिलिंद सफई हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. मात्र आज सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलिंद सफई यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टी पून्हा एकदा गहिवरून गेली आहे. मिलिंद सफई हे कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करत होते.
नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी मुशाफिरी केली होती. पुढचं पाऊल या गाजलेल्या मालिकेमुळे ते प्रकाशझोतात आले होते. ही मालिका अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. यात नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत ते झळकले होते. तर काही दिवसांपूर्वीच ते स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत सुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी नायिकेच्या म्हणजेच अरुंधतीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. पोश्टर बॉईज, लकडाऊन बी पॉझिटीव्ह या नुकत्याच येऊन गेलेल्या चित्रपटातही ते झळकले होते.
मेकअप, प्रेमाची गोष्ट, थँक यु विठ्ठला अशा चित्रपटातूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मिलिंद सफई यांना सहाय्यक भूमिकेतून प्रेक्षकांनी पाहिले आहे. त्यात ते बहुतेकदा नायक नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यामुळे गंभीर भूमिका त्यांच्या वाट्याला आलेल्या पाहायला मिळाल्या. मालिका चित्रपटातून काम करत असताना मिलिंद सफई यांनी अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले होते. त्याचमुळे त्यांच्या अशा जाण्याने मराठी सृष्टीला धक्का बसला आहे. मराठी सृष्टीतला आणखी एक तारा निखळला अशा शब्दांत भावना केल्या जात आहेत. त्यांच्या सोबत काम करणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांनी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.