२५ ऑक्टोबर रोजी ‘हर हर महादेव’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठीसह, हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड अशा पाच भाषांमधुन हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला जात आहे. नुकतेच या चित्रपटाच्या टीमने साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांची भेट घेतली. त्यांच्याहस्ते चित्रपटाचे तेलगू भाषेतील पोस्टर प्रकाशित करण्यात आले. नागार्जुन स्वतः छत्रपतींच्या चरित्राने प्रभावित झाले आहेत. तमाम चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या शरद केळकरने झी मराठी वरील बस बाई बसच्या शोमध्ये हजेरी लावली. सोबत सायली संजीव, हार्दिक जोशी यांनीही उपस्थिती दर्शवत विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली.
चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने शरद केळकर आपल्या भूमिकेबाबत खूपच उत्सुक दिसला. गमतीगमतीत ‘मी बायकोला किती घाबरतो’ याची आठवण करून दिली. मी बायकोला हिशोब नाही मागत उलट मलाच तिच्याकडून पैसे घेतल्यावर त्याचा हिशोब द्यावा लागतो. असे म्हणताच सेटवर एकच हशा पिकतो. सायली संजीवने देखील प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. सायलीला सकाळी दात घासायच्या अगोदर टीव्हीचा रिमोट हवा असतो. बिजी शेड्युलमुळे दिवसभर बातम्या पाहायला मिळणार नाहीत हे तिला माहीत असतं. म्हणून ती टीव्ही चालू करून बातम्या बघत असते. ही सवय तिला तिच्या बाबांनीच लावली होती, असे ती सांगते. सायलीला नेहमी स्पष्ट बोलायला आवडतं.
सायली म्हणते की, ‘मला जे वाटतं ते मी बोलून मोकळी होते. मग समोरच्याला आवडो न आवडो. पण मी एखादा मुलगा आवडला की प्रपोज करून टाकते. पण दुर्दैवाने कोणीही मला हो नाही बोललं. हा एपिसोड कदाचित ते बघत असतील आणि त्यांना ते कळलंही असेल.’ या उत्तरावर सुबोध भावे तिची फिरकी घेत म्हणतो की, ‘त्यांनी काय उत्तर दिलं? की मोठी हो आणि मग ये!’ ऋतुराज गायकवाड आणि सायली संजीव यांच्याबद्दल देखील चर्चा करण्यात आली. सायलीचं नाव कोणासोबत जोडलं गेलं; याबद्दल ती बोलते. ‘काहे दिया परदेसमधील सहकलाकार ऋषी सक्सेना आणि माझं नाव जोडलं गेलं होतं. पण तसं काहीच नव्हतं. तुम्हाला तर आता माहितच आहे.’
सायली असं म्हणताच अभिनेता शरद केळकरने तिची फिरकी घेतली. ऋतुराज गायकवाडच्या बाबतीतही झालं होतं; असं म्हणत अभिनेते सुबोध भावेने हा प्रश्न तिच्यासमोर मांडला. ‘असं असेल तर मला प्लीज बॅट पाहिजे’ शरद केळकर मिश्कीलपणे म्हणतो. सायली म्हणते की, बॅट मी मिळवून देऊ शकते. कारण तो माझा खरंच खूप चांगला मित्र आहे. एक आरसीबीमध्ये आहे, ऋतुराज आणि तुषार देशपांडे सीएसकेमध्ये आहेत. हे सगळे काहे दिया परदेसचे फॅन होते. मला आश्चर्य वाटलं की क्रिकेटर कसे काय सिरीअलचे चाहते. म्हणजे त्यांना कधी वेळ मिळतो मालिका बघायला. पण माझ्यापेक्षा खूप लहान आहेत ते, सायलीच्या या उत्तरामुळे मात्र ऋतुराजच्या प्रश्नावर पूर्णविराम पडला आहे.