सयाजी शिंदे यांनी वृक्षसंवर्धनाचे कार्य हाती घेत सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. यामागचा मुख्य उद्देश हाच होता की पर्यावरणाचे संरक्षण व्हावे आणि सर्वांना मोकळा श्वास घेता यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ते गावोगावी देवराई उभारली जावी आणि लोकांकडून वृक्षारोपण केले जावे या प्रयत्नात आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या मदतीने त्यांनी बीड जिल्ह्यात सह्याद्री देवराई हा प्रकल्प उभारला. बीड शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही वर्षांपासून सह्याद्री देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात देखील हा प्रकल्प त्यांनी राबवला आहे.
इतक्या वर्षांपासूनची त्यांची वृक्ष संवर्धनाची तळमळ आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. नुकतेच सयाजी शिंदे यांनी सायन रुग्णालय परिसरातील झाडे तोडण्यावर एक पोस्ट शेअर करून आपला संताप व्यक्त केला आहे. ज्या रुग्णालयात जीव वाचवले जातात तिथं १५८ जीव मारण्याची परवानगी मिळतेच कशी? याला दुसरा काहीच पर्याय सायन रुग्णालयाकडे नाही का? असा संतप्त प्रश्न त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. ही अत्यंत वाईट बातमी आहे की सायन हॉस्पिटल परिसरातील १५८ वृक्ष कापण्याची परवानगी दिली आहे ही परमिशन का दिली. आणि यातील दोन झाडं कापलेले आहेत त्याच्यावर नंबर पडलेले आहेत आणि आता यमानं सांगावं की ती १५८ माणसं आम्ही मारणार आहोत तसं या झाडांवरती बॉम्ब टाकल्यासारखं होणार आहे.
त्या झाडांवरच्या पशुपक्षांचा संसार नष्ट होणार आहे. तरी ही परमिशन का दिली? ही टाळता येऊ शकते का? झाडं वाचू शकतात का? याबाबत लगेचच विचार व्हावा कारण आपण सर्वांनी अनुभवलं की ऑक्सिजन सिलेंडरमधूनच विकतच घ्यावा लागला होता. चांगलं ऑक्सिजन देणारी झाडं का कापायची? सह्याद्री देवराईच्या वतीने मी बोलतोय की कृपया ही झाडं वाचवा. अशी प्रतिक्रिया सयाजी शिंदे यांनी देऊन झाडे कशी वाचवता येतील अशी झाडांप्रती आत्मीयता दाखवली आहे. काही दिवसांपूर्वीच सयाजी शिंदे यांनी झी मराठीवरील हे तर काहीच नाय या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी ते या देवराई प्रकल्पाबाबत भरभरून बोलले होते.
नुकताच घडलेला एक प्रसंग देखील त्यांनी यावेळी सांगितला होता की, शंभर वर्षाचे जुने झाड रस्त्याच्या मध्ये येत असल्याने काढून टाकले जाणार होते. ते झाड देवराईत आणून लावण्यात आले होते. झाड मुळासकट काढून पुन्हा लावणे खूप खर्चिक काम होते, पण ते झाड जगणं खूप महत्त्वाचं होतं. वृक्ष संवर्धनाची त्यांची तळमळ वेळोवेळी त्यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी सायन रुग्णालयातील झाडांबाबत ही काळजी व्यक्त केलेली आहे.