स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या १८ मार्चपासून घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तर सविता प्रभुणे, नयना आपटे, प्रमोद पवार, आशुतोष पत्की, उदय नेने, प्रतीक्षा मुंगेकर सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. प्रतीक्षा मुंगेकर या मालिकेतून पुन्हा एकदा नकारात्मक भूमिका साकारत आहे. तर सविता प्रभुणे या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेनंतर सकारात्मक भूमिका निभावणार आहेत.
सविता प्रभुणे यांनी मालिका सृष्टीतच नव्हे तर अगदी चित्रपट आणि नाटकातूनही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हिंदी मालिकेतूनही त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका साकारून उत्तम अभिनेत्री म्हणून नाव कमावले आहे. सातारा येथील वाई इथे सविता प्रभुणे यांचे बालपण गेले. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यांच्या अभिनयाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. मराठी रंगभूमी ते हिंदी चित्रपट आणि मालिका सृष्टीत त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आयुष्याच्या अनेक कठीण प्रसंगांना त्या सामोरे गेल्या आहेत. मुलगी सात्विकाच्या जन्मानंतर अभिनय आणि घर अशी तारेवरची कसरत त्यांनी केली. अशातच नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर एकटीने मुलीचे पालनपोषण केले.
सात्विका सिंग हिचे पार्ले टिळक शाळेतून शिक्षण झाले. शालेय शिक्षणात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून ती ओळखली जात होती. पुढे तिने एमबीएचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना सात्विकाने मॉडेलिंग केले होते. वॅन हुसेन या नामांकित सौंदर्य स्पर्धेसाठी सात्विकाने पार्टिसिपेट केले होते. पण पुढे अभिनय क्षेत्रात न येता सात्विकाने पडद्यामागे राहणे पसंत केले. वॉर्नर ब्रॉस पिक्चर्स या नामांकित निर्मिती संस्थेत ती काम करु लागली. २०२० साली रुद्रेश आनंद सोबत ती विवाहबद्ध झाली. दरम्यान मुलीच्या लग्नानंतर सविता प्रभुणे पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाल्या आहेत. स्वाभिमान या मालिकेनंतर त्या आता घरोघरी मातीच्या चुली मालिकेतून सासूची भूमिका साकारत आहेत. या नवीन मालिकेसाठी आणि नवीन भूमिकेसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.