मराठी सेलिब्रिटी विश्वात रंजक घडामोडी घडत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना अनेक कलाकारांनी साखरपुडा करून तसेच लग्न करून आयुष्याला नवी सुरुवात केलेली आहे. तर अनेकांच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झालेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सई लोकूरला कन्यारत्न प्राप्ती झाली होती. तर आता नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका अभिनेत्रीला पुत्ररत्न प्राप्ती झालेली पाहायला मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात बेबी शॉवरचे फोटो शेअर केल्यानंतर अभिनेत्री सरिता मेहेंदळे जोशी चर्चेत आली होती.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे १ जानेवारी २०२४ रोजी तिला पुत्ररत्न प्राप्ती झालेली आहे. ‘इट्स अ बॉय’ असे म्हणत सारिताने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. त्यावर आता सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. सरिता मेहेंदळे ही मूळची सांगलीची. तिचे शालेय शिक्षण सांगली जिल्ह्यातील चाटे स्कूलमधून झाले. पदवीच्या शिक्षणानंतर अभिनयाची ओढ तिला मुंबईला घेऊन आली. लहानपणापासूनच तीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि कॉलेज फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला होता. सरिता जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिने अभिनय क्षेत्रात करिअर सुरू करण्यासाठी थोडा संघर्ष केला. अर्धसत्य, ए चल असं नसतं रे अशा विविध नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
ए चल असं नसतं रे या नाटकामुळे तिला मराठी मालिकांमध्ये येण्याची संधी मिळाली. सरस्वती, कन्यादान, भागो मोहन प्यारे अशा मालिकेतून सरिता झळकली होती. कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. सरस्वती या मालिकेमुळे सरिता प्रकाशझोतात आली होती. याच मालिकेनंतर ती कन्यादान मालिकेत दिसली होती. अतुल परचुरे यांच्यासोबत तिने भागो मोहन प्यारे मालिकेत काम केले होते. या मालिकेनंतर सरिता फारशी कोणत्या मालिकेत पाहायला मिळाली नाही. सौरभ जोशी सोबत तिचे लग्न झाले असून आता ती घरसंसारात रमलेली पाहायला मिळत आहे. यातूनच आता आईपणाचा ती अनुभव घेत आहे. या नवीन प्रवासासाठी आणि बाळाच्या सुदृढ आयुष्यासाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन.