प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता तसेच मिमिक्री आर्टिस्ट संकेत भोसले आणि अभिनेत्री गायिका सुगंधा मिश्रा यांना आज कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. त्यामुळे हिंदी तसेच मराठी सृष्टीतील सेलिब्रिटींनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे खास अभिनंदन केलेले पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच संकेतने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याच्या न्यू बॉर्न बेबीचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. यावेळी संकेत डॉक्टरची भूमिका बजावत आपल्या लेकीला उचलून धरताना दिसला. हा क्युट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत संकेतने त्याचा आनंद सगळ्यांसोबत शेअर केलेला पाहायला मिळतो.

हितेन तेजवाणी, रोहीत रॉय, रिद्धीमा पंडित, डबु मलिक, करण ग्रोव्हर सह मेघना एरंडे, डॅनी पंडित, अथर्व सुदामे यांनीही दोघांचे विशेष अभिनंदन केले आहे. २०२१ साली संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा विवाहबंधनात अडकले होते. हे दोघेही मिमिक्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्धी मिळवताना दिसतात. सुगंधा मिश्रा हिला दैवी आवाजाची देणगी आहे. स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजाची ती हुबेहूब नक्कल करताना दिसते. तर मराठमोळा संकेत भोसले हा पेशाने डॉक्टर आहे पण मिमिक्री आर्टिस्ट म्हणून तो नावारूपाला आलेला पाहायला मिळतो. संजय दत्त, सलमान खान, जावेद अख्तर, फरहान अख्तर या सेलिब्रिटींची तो हुबेहूब नक्कल करताना दिसतो. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद त्याला मिळत असतो.

बाबू बेब्सचे व्हिडीओ तर चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. केस तो बनता है, गॅंग्स ऑफ फिल्मीस्तान, द कपिल शर्मा शो, द ड्रामा कंपनी, सुपरनाईट विथ ट्यूबलाईट अशा रिऍलिटी शोमध्ये संकेतने त्याची कला दाखवली आहे. तर सुगंधाने देखील अनेक रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले आहे. अशाच रिऍलिटी शोमध्ये संकेत आणि सुगंधाच्या प्रेमाचे सूर जुळून आले होते. त्यावेळी एका मराठमोळ्या कुटुंबाची भावी सून म्हणून सुगंधा चर्चेत आली होती. लग्नानंतर दोन वर्षाने कन्यारत्न प्राप्ती झाल्याने दोघांचेही कुटुंबीय खूपच आनंदित झाले आहेत. सध्या तरी संकेतने लेकीचा चेहरा लपवलेले पाहायला मिळतो आहे. पण काही दिवसांनी तिला तो नक्कीच चाहत्यांसमोर आणेल याची खात्री आहे. तूर्तास संकेत भोसले आणि सुगंधा मिश्रा दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन.