चित्रपट आणि मालिकेतून एक विशिष्ट प्रकारची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते. अशीच एक भूमिका सध्या टाईमपास ३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळते. २९ जुलै रोजी हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांची प्रमुख भूमिका असलेला टाईमपास ३ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात हृता डॅशिंग पालवीची भूमिका साकारत आहे. पालवी ही भाईगिरीच्या दुनियेतील डॉन असलेल्या दिनकर पाटीलची मुलगी आहे. दिसायला गुंड पण मनाने हळवा असलेला हा डॉन आपल्या लेकीच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. आपल्या लाडक्या लेकीला तो ‘फालवी’ या नावाने हाक मारतो त्यामुळे पालवी देखील त्याला फफ्फा नावाने हाक मारते.
दिनकर पाटील हा शाळा शिकलेला नाही मात्र आपल्या लेकीची तो स्वप्न पूर्ण करताना दिसत आहे. चित्रपटात संजय नार्वेकर यांनी साकारलेला दिनकर पाटील तेवढाच भाव खाऊन जाताना दिसतो. गुंड पण हळवा असतो हे त्याने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. तर हृताने निभावलेली बिनधास्त पालवी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. बाप लेकीची ही जोडी चित्रपटात धमाल उडवून देताना दिसणार आहे. प्रेक्षकांनी देखील या बाप लेकीच्या धमाल नात्याचं मोठं कौतुक केलं आहे. संजय नार्वेकर यांनी बऱ्याचशा चित्रपटातून विनोदी खलनायकी ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. वास्तव या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी देढ फुटयाची भूमिका गाजवली होती.
अर्थात या भूमिकेने संजय नार्वेकर यांना वेगळी ओळख बनवून दिली होती. आजही हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांना याच नावाने ओळखले जाते. त्यामुळे टाईमपास ३ या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अन्विता फलटणकर, आरती वडगबाळकर, भाऊ कदम, वैभव मांगले, मनमित पेम. ओंकार राऊत, प्रियदर्शन जाधव अशी बरीचशी कलाकार मंडळी या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. कृतिका गायकवाड हिने या चित्रपटात एक आयटम सॉंग केलं आहे. तिच्यावर चित्रित झालेलं ‘वाघाची डरकाळी’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
प्राजक्ता आणि दगडूची ही जोडी चित्रपटाच्या सिक्वलमध्ये बदलली असल्याने प्रेक्षकांसमोर एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र हृता दुर्गुळे कोणत्याही भूमिकेत फिट बसू शकते हे आता या चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्पष्ट झालं आहे. त्यात विनोदी खलनायक रंगवलेले संजय नार्वेकर सुपरहिट ठरणार याची खात्री आहे. या दोघांचे फफ्फा आणि फालवीचे डायलॉग मात्र थिएटर्समध्ये एकच हशा पिकवून देणार याची खात्री आहे.