महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आतापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकार जोडले गेले तर काहींनी मध्येच साथ सोडली. या सर्वांमध्ये समीर चौघुले यांच्या अभिनयाची नेहमी वाहवा केली जाते. समीर चौघुले महाराष्ट्र हास्यजत्रेतील महत्वाचे पान आहे. लोचन मजनू असो वा गौरवचे होणारे सासरे अशा त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. या २९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चांगले वाईट अनुभव घेतले. त्या सर्वांचा आढावा देणारी समीर चौघुले यांची एक भावुक पोस्ट व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच हास्यजत्रेच्या मंचावर सोनाली कुलकर्णी हिने हजेरी लावली होती.
एका स्किटमधला समीर चौघुले यांचा अभिनय तिला खूपच भावला. सोनालीने चार्ली चॅपलीनची एक मूर्ती देऊन समीर चौघुले यांचा गौरव केला. हा सन्मान पाहून भारावून गेलेल्या समीर यांनी याबद्दल आभार व्यक्त करताना म्हटले आहे की, कलाक्षेत्रात एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे अत्यंत हृदयापासून खुल्या दिलाने कौतुक करणे ही गोष्ट तशी विरळच.. माझ्या २९ वर्षाच्या कारकिर्दीत सहकलाकारांनी माझ्यावर केलेले निस्सीम प्रेमही अनुभवले आणि ईर्षा, जेलसी, इनसिक्युरिटी हे प्रकारसुद्धा अगदी जवळून बघितले, अनुभवले. आपल्याला इतरांच्या यशाचा जेवढा आनंद होतो तेवढा आनंद आपल्या यशाचा इतरांना होतो का? हा प्रश्न बरेचदा मला पडायचा. आपल्या जवळचे अनेक जण सोशल मीडियावर आपल्याबद्धल खूप वेगळे react होतात.
पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं खरं स्वरूप अत्यंत वेगळं असतं. पण शेवटी हे सगळ कलाक्षेत्राचा अविभाज्य भाग म्हणून मी ग्रेसफुली स्वीकारायला ही शिकलो. असे प्रकार कदाचित फक्त आमच्या कलाक्षेत्रापुरत मर्यादित नसावेत. या पार्श्वभूमीवर सोनाली कुलकर्णी सारखे कलाकार असतात. देवाने ज्यांच्या शरीरात काळजा ऐवजी नदीचे विशाल पात्र बसवलेले असते. सोनाली या आमच्या हास्यजत्रेच्या कुटुंबातील प्रेमळ हास्यरसिक. आज माझ्या एका प्रहसनानंतर सोनाली कुलकर्णी यांनी माझ्या देवाची म्हणजेच “सर चार्ली चॅप्लिन” यांची एक अत्यंत सुंदर मूर्ती देऊन माझा गौरव केला. ही अत्यंत सुंदर मूर्ती पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधरसर यांनी घडवली आहे. देवधरांनी घडवलेली ही चार्ली सरांची दुसरी मूर्ती माझ्या घरी आली. पहिली श्री. सुहास काळे वपु काळे यांचे सुपुत्र यांनी दिलेली स्नेहभेट होती.
सोनाली यांना ही मूर्ती पेण येथील स्नेही श्री विनायक गोखले यांनी भेट दिली होती. पण सोनाली मला म्हणाली समीर, ज्या क्षणी ही मूर्ती माझ्या हातात आली त्या क्षणी मला तुझी आठवण आली. बरेच दिवस या मूर्तीचे वजन मला पेलवता येत नव्हते. आज ती योग्य हातात देताना मला खूप आनंद होतोय. ही तिची वाक्य माझ्यासाठी मोठा आनंदाचा सोहळा होता. देवाने स्वर्गातून पृथ्वीवर शिंपडलेल्या पंचामृताचा थेंब होता. सोनाली कुलकर्णी सर्वोत्तम अभिनेत्री आहेत हे सर्वांनाच माहिती आहे. पण त्यांचे हे gesture या कलाक्षेत्रातील त्यांचे माणूसपण आणि वेगळेपण ठळकपणे दर्शवत. सोनाली कुलकर्णी तुझे खूप खूप आभार, मनापासून आभार सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर, thank you Sony मराठी. विशेष म्हणजे हा भाग जेव्हा चित्रित झाला. त्या दिवशी बाप्पाच्या आगमनाचा दिवस होता. माझा बाप्पा साश्रू नयनांनी माझ्या घरी आला, कायमचा.