महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोने काही काळासाठी ब्रेक घेतलेला आहे. मात्र त्यातील समीर चौघुले यांनी सादर केलेले एक प्रहसन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. समीर चौघुले या प्रहसनामध्ये आदिवासींचे तारपा नृत्य प्रकार सादर करत असतात. मात्र हे तारपा नृत्य सादर करताना समीर चौघुले या नृत्याची खिल्ली उडवताना पाहायला मिळाले. याच कारणास्तव आदिवासी समाजाने समीर चौघुले यांना चांगलेच धारेवर धरलेले आहे. तारपा नृत्य सादर करताना समीर चौघुले यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपली चूक मान्य करावी अशी मागणी आदिवासी समाजाने केली आहे.
त्यानुसार काही दिवसांपूर्वीच समीर चौघुले या आदिवासी समाजातील बांधवांची भेट घेतात आणि तिथे जाहीरपणे सगळ्यांची माफी मागतात. यावेळी समीर चौघुले यांनी माफी मागताना म्हटले आहे की, झालेल्या प्रकाराबद्दल मी सर्वात आधी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. मी एका प्रहसनात तारपा नृत्य सादर करत होतो असं सांगितलं होतं, ती ३० सेकंदाची क्लिप होती. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. माझ्या लक्षात आलं की यातून आदिवासी समाजाच्या मी भावना दुखावल्या आहेत. घडलेल्या प्रकरणावर मी तुमची सर्वांची माफी मागतो. हा प्रकार अनावधानाने झाला होता, यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू कधीच नसतो आणि तो भविष्यात सुद्धा नसणार आहे.
असे म्हणत समीर चौघुले यांनी सर्वांची जाहीरपणे माफी मागितली आहे. याअगोदर देखील कलाकारांच्या बाबतीत असे प्रकार अनेकदा घडले आहेत. अगदी चला हवा येऊ द्या मध्ये असे आक्षेपार्ह स्किट सादर करत असताना भाऊ कदम, निलेश साबळे यांनाही जाहीरपणे माफी मागावी लागली आहे. आपल्या विनोदातून कोणाची खिल्ली उडवली जाऊ नये याची काळजी या कलाकारांना नेहमीच घ्यावी लागत असते. पण त्यातूनही अनावधानाने कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्यांना टीकेचा रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे लेखकाने आणि कलाकाराने या बाबत योग्य ती काळजी घेऊनच स्किट सादर करावे. नाहीतर अशा परिस्थितीला आणि वादाला त्यांना तोंड द्यायला लागते.