लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा तिहेरी संगमातून तयार झालेला सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. चित्रपट संपल्यानंतर डोळे पुसत बाहेर पडलेले चेहरे हेच या चित्रपटाच्या खऱ्या यशाचं गमक म्हणावे लागेल. अनेक मान्यवरांनी सलील कुलकर्णी यांच्या कामावर कौतुकाची थाप दिली आहे. सुमित राघवन, उर्मिला कोठारे, डॉ मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर क्षोत्री यांच्या सहजसुंदर अभिनयाला देखील दाद द्यावीशी वाटते. बाप लेकाच्या नात्यावर भाष्य करणारा, संदेश देणारा, कौटुंबिक जिव्हाळ्याचा आणि घरातील सर्वांनी एकत्र बसून बघावा असा हा चित्रपट असल्याने या चित्रपटाचे कौतुक केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट पाहण्यासाठी अभिनव विकास फाउंडेशनचे विकास बोरकर हे काही गरीब आणि अनाथ मुलांना घेऊन चित्रपट पाहायला आले होते. त्यावेळी एका मुलाने सलील कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. त्याच्या एका वाक्याने सलील कुलकर्णी भारावून गेलेले पाहायला मिळाले. या प्रसंगी सलील कुलकर्णी म्हणतात की, “एकदा काय झालं” ला मिळत असलेली दाद भारावून टाकणारी आहे. माध्यम प्रतिनिधींनी दिलेले ४.५ स्टार. अनेक मान्यवरांनी केलेले फोन, आपापल्या फेसबुक ट्विटरवर लिहिलेले रकानेच्या रकाने आणि सर्वात जास्त भरभरून बोलतायत ते चित्रपट संपल्यावर दिसणारे रसिकांचे चेहरे. या सगळ्यात आज एक घटना घडली. अभिनव विकास फाउंडेशनचे विकास बोरकर काही गरीब आणि काही अनाथ मुलांना घेऊन चित्रपट बघायला आले.
चित्रपटानंतर मी भेटायला गेलो आणि ती मुलं कुतूहलाने माझ्याकडे बघत होती. एक आठ नऊ वर्षांचा मुलगा वाट काढत माझ्यापाशी आला आणि म्हणाला, “सर, पिक्चर पाहिला. मला आज कळलं की बाप कसा असतो.” त्याच्या डोळ्यांत आमच्या चित्रपटाला रघु दिसला आणि चिंतन पण, आणि मनात काहीतरी हललं. आज त्या मुलाने एक असा पुरस्कार दिला जो आमच्या घरात दिसणार नाही. कुणाला पण मी माझ्या मनात कायम मिरवत राहीन! असे पुरस्कार फार काही देऊन जातात. आणि म्हणूनच उद्या तुम्हाला भेटायला, तुमच्या प्रतिक्रिया बघायला येतो आहे. तुमच्या डोळ्यातले रिव्ह्यू खूप महत्त्वाचे आहेत, नक्की भेटू!