ओंकार भोजने आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा या दोन्ही गोष्टी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. फु बाई फु या झी मराठीवरील शोमध्ये ओंकार झळकणार असे समजल्यावर त्याने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा सुरू झाल्या. अर्थात या शोने आता अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांचा निरोप घेतल्याने ओंकारचे आता काय होणार? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. त्यावरून त्याला ट्रोलही करण्यात येऊ लागले होते. हास्यजत्रामुळे ओंकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला होता. दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक कलाकार अशा सगळ्यांनीच जमेची बाजू निभावत ओंकारला प्रसिद्धी मिळवुन दिली.
परंतु हा शो सोडून त्याने झी मराठीकडे आपली पाऊले वळवली. इथे आल्यावर ओंकारने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने स्कीट्स सादर केले, मात्र त्या स्कीट्समध्ये ताकद नसल्याने ओंकारची जादू इथे फारशी कमाल घडवू शकली नाही. या शोमधील सहभागी झालेले बहुतेक कलाकार हे नामवंत जरी असले तरी केवळ कमकुवत लिखाणामुळे शोकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. परिणामी फु बाई फु ला अल्पावधीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. हास्यजत्रा मधील पंढरीनाथ कांबळे याने देखील हा शो सोडून फु बाई फु चा प्रस्ताव स्वीकारला होता. मात्र त्याला देखील प्रेक्षकांनी नाकारले, आणि म्हणूनच आता या कलाकारांचे पुढे काय होणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होऊ लागली. यावर हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ओंकार हास्यजत्रा मध्ये होता तेव्हा तो चित्रपटाच्या निमित्ताने शोमधून ब्रेक घेत होता. ओंकारबद्दल बोलायचं झालं तर मी अगदी मनमोकळे पणाने सांगतो की तो एक उत्कृष्ट नट आहे. लोकांना काय वाटलं की तो सिनेमासाठी म्हणून या शोमधून गेला होता. आम्हालाही त्याने तसं सांगितलं होतं. मात्र तो पैशासाठी गेला अशी चर्चा सुरू झाली, त्याबद्दल मला काही माहिती नाही. असं कदाचित त्याचाही हाच हेतू असेल. पण आता त्याचे परिणाम काय होतायत ते काम करत असलेला संच, प्रेक्षक यांच्यामधला विषय आहे. पण मला काही त्याच्याविषयी कुठला आकस नाही आणि कोणालाच नाही. फक्त त्याने जरा हे आधी येऊन आम्हाला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. यापूर्वीही एकदा असं झालं होतं.
ओंकारबरोबर काम फक्त एकटा ओंकार करत नाही तर सगळी टीम मदतीला असते. म्हणजे त्याच्या जोडीला कलाकारांची, लेखकांची आठ जणांची टीम काम करत असते. आम्ही आहोत, सहयोगी कलावंत ह्या सगळ्यांनी मिळून एक कलाकृती तयार होत असते. सचिन गोस्वामी यांच्या या मतानंतर त्यांचा ओंकार भोजनेवर कुठलाही राग नसल्याचे स्पष्ट होते. हास्यजत्रा, फु बाई फु नंतर ओंकार आता सरला एक कोटी या चित्रपटात अभिनेत्री ईशा केसकर सोबत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २० जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. मात्र त्यानंतर तो पुन्हा हास्यजत्रामध्ये येणार का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांसमोर आहे.