मराठी सृष्टीत गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत असलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे हिची स्वप्नपूर्ती झालेली आहे. आपल्या हक्काचं घर घेणे ही प्रत्येक सामान्यांची इच्छा असते. त्यात कलाकार सुद्धा मुंबईत येऊन अशी स्वप्नं रंगवत असतात. ऋतुजा बागवे हिने मराठी सृष्टीत पाऊल टाकले ते रंगभूमीवरून. गोची प्रेमाची हे तिचं पहिलं व्यावसायिक नाटक. मालिका, चित्रपट, रंगमंच अशा माध्यमातून ऋतुजा दर्जेदार भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली. अनन्या या नाटकाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. नांदा सौख्य भरे मालिकेमुळे ऋतुजाला प्रथमच मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
सहाय्यक अभिनेत्री ते प्रमुख भूमिका अशा तिच्या या प्रवासात अभिनयाचे अनेक पैलू उलगडत गेले. यातूनच आता तिने आपलं स्वतःचं घर घेऊन आईवडिलांना सुखद धक्का दिला आहे. स्वप्नातल्या घराचा ताबा मिळाल्यानंतर त्याला आता खरं खुरं घर कसं बनवायचं या प्रयत्नात ती आहे. आपल्या कुटुंबासोबत गृहप्रवेश करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली पाहायला मिळते. अर्थात घर घेण्यासाठी करण्यासाठी ऋतुजाने पैशांची जमवाजमव कशी केली. याचे गणित सांगताना ती म्हणते की, शाळेत असताना बाबा ५ रुपये पॉकेट मनी द्यायचे. ३ रुपये खर्च करून २ रुपये पिग्गी बँक मध्ये ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५ रुपये पिग्गी बँकमध्ये टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, बारीकसारीक गोष्टींसाठी केलेले त्याग.
आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे हे शक्य झालं. अर्थात इथपर्यंतचा तिचा हा प्रवास निश्चितच तिच्यासाठी सोईस्कर नव्हता. कारण मराठी सृष्टीत तुम्हाला तग धरून ठेवण्यासाठी तेवढीच मेहनत देखील घ्यावी लागते. गेल्या काही दिवसांपासून ऋतुजाच्या घरी आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच ऋतुजाच्या बहिणीचे थाटात लग्न पार पडले होते. या लग्नानंतर ऋतुजाने स्वतःच्या घरात कुटुंबासह गृहप्रवेश केला आहे. तर लवकरच ती स्वतः लग्नाच्या बोहल्यावर सुद्धा चढणार आहे. लग्नाचे संकेत तिने दिलेल्या एका मुलाखतीत केले होते. त्यामुळे एकापाठोपाठ एक असे आनंदाचे क्षण ती साजरे करताना दिसत आहे. यानिमित्ताने ऋतुजाचे कलासृष्टीतून मोठे कौतुक केले जात आहे.