मराठी कलाविश्वात कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली आहे. काल ३१ जानेवारी रोजी अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप साखरपुडा करून चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. याच दिवशी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋता काळे आणि अभिषेक लोकनर यांचाही मोठया थाटात लग्नसोहळा पार पडला. ऋता काळे ही झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत इराची भूमिका साकारत आहे. तर अभिषेक लोकनर हा आघाडीचा दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ऋता आणि अभिषेकच्या लग्नाची लगबग सुरू होती. मेंदी सोहळ्यात अभिषेकने त्याच्या हातावर ऋताचे नाव काढले होते. त्यानंतर या दोघांचा संगीत सोहळा पार पडला. हिंदी मराठी गाण्यावर दोघांनीही ठेका धरत मित्रांनाही नाचायला भाग पाडले होते. त्यानंतर काल मंगळवारी या दोघांनी थाटात लग्न केले. सप्तपदीला ऋताने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. लग्नाच्या सोहळ्यात या दोघांनी त्यांच्या जवळच्याच नातेवाईक मित्रमंडळींना आमंत्रण दिले होते. अभिनेता सौरभ गोखले आणि अनुजा साठे या दोघांनी लग्नसोहळ्याला हजेरी लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. ऋता काळे ही थिएटर आर्टिस्ट आहे.
अनवट आणि पंधरवडा अशा चित्रपटातून ऋता झळकली आहे. अभिषेक लोकनर हा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता तेव्हाच दोघांच्या प्रेमाचे सूर जुळून आले होते. मालिका चित्रपट करत असताना ऋताला झी मराठीच्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत ईराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. पण गेल्या काही दिवसांपासून मालिकेत अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या सिनवर जास्त भर देण्यात आला आहे. त्यामुळे ऋताला तिच्या लग्नासाठी मालिकेतून ब्रेक घेता आला. काही दिवसानंतर ऋता पुन्हा मालिकेत रुजू होईल असे सांगण्यात आले आहे. तूर्तास ऋता काळे आणि अभिषेक लोकनर या नवविवाहित दाम्पत्याला आयुष्याच्या नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.