झी मराठी वाहिनीचा अवॉर्ड सोहळा नुकताच संपन्न झाला. अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मालिका म्हणून नवा गडी नवं राज्य या मालिकेने पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट नायक म्हणून स्वप्नील जोशी आणि सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून दीपा चौधरीला पुरस्कार प्रदान करण्यात आला. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला देखील विविध पुरस्कार देण्यात आले. तू तेव्हा तशी मालिकेतील राधा म्हणजेच रुमानी खरे हिने आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. रुमानीने सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्कार पटकावला.

पहिली मालिका आणि त्यासाठी पहिलं नामांकन मिळाल्यानंतर रुमानीने आनंद व्यक्त केला होता. या प्रवासात अभिनयाची दखल घेतली गेल्याने रुमानीचे वडील म्हणजे गीतकार, गायक संदीप खरे यांनी आनंद व्यक्त केला. ‘बघता बघता मोठी झाली, अवघी क्षितिजे छोटी झाली! या हर्षाने मन अनिवार, आपले गेले आपल्या पार!’ अशा शब्दात त्यांनी रुमानीचे कौतुक केले आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत रुमानी राधाची भूमिका साकारत आहे. राधाने नुकताच निलला आपला होकार असल्याचे सांगितल्याने मालिका एका रंजक वळणावर आली आहे. राधाचा बिनधास्तपणा रुमानीचे तिच्या सहजसुंदर अभिनयाने चांगला वठवला आहे. त्याचमुळे तिची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावलेली दिसते. शाळेत असल्यापासूनच रुमानी नाटक, चित्रपटातून काम करत होती.

चिंटू आणि चिंटू २ या चित्रपटांमध्ये रुमानी बालकलाकार म्हणून झळकली. अभिनयासोबतच रुमानीला नृत्याची विशेष आवड आहे. रुमानीने कथ्थकचे प्रशिक्षण घेतलं आहे. २०१९ साली ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. रुमानी खरे हीने अभिनव विद्यालय तसेच एस पी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मधल्या काळात बालभारतीने एक डॉक्युड्रामा साकारला होता; त्यात रुमानीला देखील झळकण्याची संधी मिळाली होती. बालभारतीचा प्रेरक इतिहास आणि संस्थेने आजवर केलेली प्रगती नव्या पिढीला समजावी म्हणून हा डॉक्युड्रामा बनवण्यात आला होता. कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
स्वप्नील जोशी, शिल्पा तुळसकर, उज्वला जोग, सुहास जोशी यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत तू तेव्हा तशी मालिकेत रुमानीला महत्वाची भूमिका मिळाली. उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री व्यक्तिरेखा पुरस्काराने नावाजण्यात आले. आई वाडीलांमुळेच हे सर्व शक्य झालं असे ती या पुरस्काराबाबत म्हणते. मालिकेतील सर्व कलाकारांनी मला समजावून घेतले आणि वेळोवेळी प्रोत्साहन देखील दिले हे ती न विसरता सांगते. राधावर भरभरून प्रेम देणाऱ्या प्रेक्षकांचेही तिने आभार मानले आहेत.