मराठी मालिका सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रोहित परशुराम आणि पत्नी पूजा यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही बातमी कळताच दोघांवर सेलिब्रिटींकडून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोहित परशुराम हा सध्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका साकारत आहे. अर्जुन नुकताच जेलमधून बाहेर पडला आहे पण त्याच्या कृत्यामुळे घरी सगळेजण नाराज आहेत. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रोहित परशुराम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला पाहायला मिळतो. रोहितची पत्नी पूजा ही देखील मॉडेल आहे.
अनेक सौंदर्य स्पर्धेत पूजाने सहभाग दर्शवला होता. यातूनच काही स्पर्धांसाठी तिला बक्षिसं देखील मिळालेली आहेत. रोहित परशुराम हा अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर शरीर सौष्ठव म्हणून नाव लौकिक करत होता. पण मित्राच्या सल्ल्याने त्याने मिथुन चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा या चित्रपटात त्याला विरोधी भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली. खरं तर शरीरसौष्ठव म्हणून नाव लौकिक मिळणाऱ्या रोहितचे वजन या भूमिकेसाठी खूपच जास्त होते. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या काही दिवसात त्याने आपले वजन घटवले होते. मिथुन चित्रपटानंतर रोहित हिंदी मालिकांमध्येही झळकला. क्रिमीनल्स, ज्ञानेश्वर माऊली, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमधून त्याला छोट्या, मोठ्या भूमिका मिळत होत्या.
मात्र अप्पी आमची कलेक्टर या मालिकेने त्याचे नशीबच पालटले. अजुर्नची डॅशिंग आणि अप्पी सोबतची हसतमुख भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली. या अनोख्या भूमिकेमुळे रोहित परशुराम मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. चित्रपटामधून नशीब आजमावल्यानंतर रोहितला मराठी मालिकेमधून खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. काही महिन्यांपूर्वी रोहितने पत्नी पूजाचे डोहाळजेवण थाटात केले होते. त्यावर सेलिब्रिटींनी आणि रसिक प्रेक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता. त्यानंतर काल रविवारी २ जुलै २०२३ रोजी या दाम्पत्यास कन्यारत्न प्राप्ती झाल्याचे समोर आले. कन्यारत्न प्राप्तीसाठी रोहित आणि पूजाचे खूप खूप अभिनंदन.