सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. ऋतुराज चौधरी या नावाच्या तरुणाने ५१ सेकंद गुगलचे इंजिन हॅक करून हलकल्लोळ माजल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली आहे. त्यानंतर ऋतुराजने गुगलची सेवा पूर्ववत करून हा गोंधळ एका बगमुळे झाला असल्याचे गुगलला कळवले. त्याबदल्यात गुगलने ऋतुराजला तब्बल ३.३६ करोडोंच्या नोकरीची ऑफर देऊ केली. आणि त्याचा पासपोर्ट बनवून अमेरिकेत घेऊन जाणार. असा मेसेज या बातमीतून व्हायरल होताना दिसत आहे. मात्र बातमीची कुठलीही शहानिशा न करता आणि त्यामागचे तथ्य जाणून न घेता अनेकांनी ऋतुराजचे कौतुक करत ही बातमी शेअर केलेली पाहायला मिळाली.
यामागचे खरे कारण नुकतेच समोर आले असून, स्वतः ऋतुराजने या बातमीचे खंडन केलेले पाहायला मिळत आहे. ऋतुराज चौधरी हा बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील मुंजेरीगंज येथील भाजी मंडई रोडजवळ राहतो. ऋतुराजला सायबर सिक्युरिटी आणि एथिकल हॅकिंग क्षेत्राची विशेष आवड आहे. भविष्यात मला या क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी जर्मनी किंवा इस्राईल मध्ये जाण्याची ईच्छा आहे. मात्र सोशल मीडियावर सध्या माझ्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. ऋतुराज याबाबत म्हणतो की, गुगलने मला कोणतीच नोकरी ऑफर केलेली नाही आणि कुठले पैसेही देऊ केलेले नाहीत. मी गुगल हॅक केले नव्हते तर केवळ त्यातला एक बग शोधून काढला होता.
ही बाब गुगलच्या लक्षात आणून देण्याचे काम मी केले होते. बग शोधून काढणे आणि हॅक करणे या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. मला अमेरिकेत बोलावले आणि काही तासात माझे पासपोर्ट देखील बनवले ही देखील चुकीची बातमी आहे. माझा पासपोर्ट अजून बनत आहे. गुगलमध्ये असलेली एक चूक मी शोधून काढली त्याला गुगलकडून माझ्या नावाने मेंशन केलं आहे. हा बग शोधून काढण्यासाठी अनेक स्टेप्स आहेत त्याबदल्यात गुगल तुम्हाला योग्य ती किंमत देते. मी शोधलेला बग पी २ या स्टेजला आहे. प्रामुख्याने बग पी ० ते पी ५ या स्टेजमध्ये असतात. माझ्याबाबत आणखी एक खोटी बातमी पसरवली जात आहे की मी मणिपूर आयआयटी मध्ये शिक्षण घेत आहे.
मुळात मणिपूरमध्ये असे कुठेच आयआयटी नाहीये. त्यामुळे या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ऋतुराजने केलेले पाहायला मिळत आहे. ऋतुराजने गुगलमध्ये एक बग शोधून काढला, मात्र त्याला मिडियामाध्यमात वेगवेगळ्या पद्धतीने रंगवून सांगितले जात आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्याने केले आहे. या क्षेत्रात मला अधिक शिकण्याची ईच्छा आहे, त्यासाठी भविष्यात मी जर्मनी किंवा इस्राईल सारख्या ठिकाणी नक्की जाईल.