काल शुक्रवारी १४ जुलै रोजी रविंद्र महाजनी यांचा मृतदेह एका बंद खोलीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याने ही घटना उघडकीस आली. तीन दिवसांपूर्वीच रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या मृत्यूची बातमी मुलगा गश्मीरला कळवण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रविंद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा मुंबईहून तळेगाव दाभाडे येथील संबंधित हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता.
मिडियासमोर त्यावेळी तो स्पॉट झाला होता. रविंद्र महाजनी एकटेच राहत असल्याने त्यांच्या मृत्यूची खबर त्याला नव्हती. रविंद्र महाजनी ज्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होते तिथे असणाऱ्या शेजारच्यांना ते मराठी सृष्टीचे अभिनेते आहेत हेच मुळी माहीत नव्हते. याचे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्यानंतरच त्यांची खरी ओळख स्थानिकांच्या समोर आली. आज दुपारपर्यंत रविंद्र महाजनी यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रविंद्र महाजनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना साश्रु नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी रविंद्र महाजनी यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले तर गश्मीरच्याही डोळ्यात अश्रू दाटून आले होते.
खेदाची बाब म्हणजे मराठी सृष्टीतील प्रवीण तरडे आणि रमेश परदेशी या कलाकारां खेरीज कोणताही कलाकार त्यांचे अंत्यदर्शनासाठी हजर राहिलेला नव्हता. ही एक मोठी शोकांतिका आणि मराठी सृष्टीसाठी एक लाजिरवाणी गोष्ट म्हणावी लागेल. मराठी सृष्टीतील हँडसम सुपरस्टार अशी ओळख मिळवलेल्या या नटाला केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जाते. मात्र प्रत्यक्षात त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी एकही मोठा कलाकार तिथे आला नाही. एव्हाना हिंदी सृष्टीतील कलाकारांना श्रद्धांजली वाहणारे हेच मराठी कलाकार हळहळ व्यक्त करतात. मात्र इथे तेवढी दखल का घेतली गेली नाही हीच मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. रविंद्र महाजनी यांचे काही मोजकेच चाहते यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमीत हजर होते.