माधवी आणि रविंद्र महाजनी यांचा प्रेमविवाह झाला होता. पण रविंद्र महाजनी काहीच काम करत नसल्याने आणि अर्धवट शिक्षण सोडून दिल्याने त्यांच्या लग्नाला माधवीच्या आईने विरोध दर्शवला होता. फक्त तो देखणा आहे आणि ह रा महाजनी यांचा मुलगा आहे, एवढीच जमेची बाजू ठरली होती. या दोघांचे प्रेम कसे जुळले याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात. माधवी महाजनी या लग्नाअगोदरच्या माधवी मोटे. पणजोबा कृष्णराव मोटे हे मूळचे विदर्भाचे.
सावकारी घराणं असल्याने त्यांच्याजवळ सोनं नाणं पुष्कळ होतं. फक्त चोरीला जाऊ नये म्हणून ते हे सोनं जवळ असलेल्या विहिरीत लपवून ठेवत असत. त्यामुळे माहेरी आर्थिक चणचण कधी जाणवलीच नाही. बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्ये, फियाट कंपनीचे गुलाबचंद दोषी ह्या मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध होते. वडिलांच्या निधनानंतरही घरखर्चाला हातभार लागावा म्हणून आईने नोकरी केली होती. त्यामुळे तिघी मुलींच्या पालनपोषणात जराही कसूर झाली नाही. लाडात वाढलेल्या तिन्ही मुलींची त्यांनी शिक्षणं करून दिली. किंग जॉर्ज शाळेत त्या शिक्षण घेत होत्या. दहावीत असतानाच माधवी ओळख नसतानाही रविंद्र महाजनी यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
शाळेत असताना त्या ज्या बाकावर बसायच्या तिथल्या खिडकीतून रस्ता दिसायचा. रस्त्याने जाताना त्यांना एक देखणा तरुण दिसायचा. त्याच्या जाण्याची वेळ माधवी यांनी हेरून ठेवली होती. तो देखणा तरुण जेव्हा दिसायचा तो दिवस खूप आनंदी जायचा. पण ज्या दिवशी त्याचे दर्शन होत नसे तो दिवस त्यांना वाया गेल्यासारखा वाटायचा. शाळा सुटल्यानंतर सगळ्या मैत्रिणी नाक्यावर येऊन भेटायच्या. तिथेच काही मुलंही गप्पा मारायला यायची. त्यातील एका मुलासोबत त्यांनी त्या देखण्या तरुणाला पाहिले होते. तेव्हा त्याचे नाव रविंद्र असल्याचे त्यांना कळले. तेव्हा त्या मित्राला रवीशी ओळख करून दे असे त्या बोलल्या होत्या. तेव्हा त्या मित्राने माधवीची रवीशी ओळख करून दिली.
रविंद्र महाजनी यांनी त्यावेळी माधवी यांना शेकहॅन्ड केले होते. त्यानंतर बऱ्याचदा या दोघांची नाक्यावर भेट होऊ लागली. रविंद्र महाजनी यांचे देखणे रूप पाहून माधवी महाजनी त्यांच्या प्रेमातच पडल्या होत्या. त्या दिवसात रविंद्र महाजनी यांना दारूचे, जुगाराचे व्यसन जडले होते. हे माहीत असूनही माधवी रविंद्रच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या होत्या. जुगारात पैसे हरलेल्या रविंद्र यांना माधवी धीर द्यायच्या. आपल्याला नोकरी करायची नाही हिरो बनायचंय असे ते त्यांना नेहमी सांगत असत. यातूनच रविंद्र महाजनी यांनीही माधवी सोबत लग्न करण्याचे बोलून दाखवले होते. घरच्यांचा विरोध डावलून त्यांनी रविंद्र महाजनी त्यांच्यासोबत लग्नाची गाठ बांधली होती.