स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत नुकताच होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मालिकेत अनेक घडामोडी घडल्या. कार्तिक दिपाला नशेमध्ये मी कधीही बाप होणार नाही हे सत्य उघड करताना दिसतो. दीपा आणि कार्तिकचे हे बोलणे मात्र कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत असते हे त्यांना माहीत नसते. हा धक्कादायक खुलासा सौंदर्याला समजणार का हे येत्या काही दिवसातच पाहायला मिळेल. कालच्या भागात श्वेता फोनवर बोलत असताना जवळच दीपिका असल्याचे तिला समजते ते पाहून ती अनाथ मुलगी आहे हे मुद्दामहून बोलते. श्वेताचे हे बोलणे ऐकून दीपिका मात्र अस्वस्थ होते आणि रडू लागते. तर दुसरीकडे दीपा आणि कार्तिक यांच्यात गैरसमज झालेले असतात. हे वाद मिटवण्यासाठी ती कार्तिककडे माफी मागायला जाते.
मात्र यात तिला कार्तिकचेच बोलणे ऐकून घ्यावे लागते. मला फक्त गैरसमज दूर करायचे होते म्हणून मी इथे आले होते, हे दीपा कार्तिकला स्पष्ट सांगते. आणि ती कार्तिकीला घेऊन तिथून निघून जाते. त्यांच्या पाठोपाठ दुखावलेली दीपिका देखील घर सोडून कार्तिकीच्या घरी जाते. मालिकेत दीपिका अनाथ नसून ती दीपा आणि कार्तिकचीच मुलगी आहे. हे तिला कधी समजणार याची प्रेक्षक आता वाट पाहत आहेत. दीपिकाची भूमिका बालकलाकार स्पृहा दळी हिने साकारली आहे. स्पृहा सध्या पहिल्या इयत्तेचे धडे गिरवत आहे. शाळा ऑनलाइन असल्याने तिला मालिकेत देखील काम करण्याची संधी मिळाली आहे. रंग माझा वेगळा या मालिकेसाठी स्पृहाने ऑडिशन दिली होती, त्यात तिचे सिलेक्शन झाले होते.
मालिकेत सगळ्यात छोटी असल्याने सेटवर तिचे खूप लाड केले जातात. मालिकेतील कार्तिकी म्हणजेच बालकलाकार साईशा भोईर हिच्याशी तिची चांगली गट्टी जमली आहे. या दोघीजणी सेटवर मजामस्ती करताना दिसतात. रंग माझा वेगळा ही स्पृहाची पहिलीच मालिका आहे. दीपिकाच्या भूमिकेमुळे स्पृहाला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. स्पृहा दळी ही स्टार किड्स म्हणून ओळखली जाते. मराठी मालिका अभिनेत्री वेदश्री दळी हिची ती मुलगी आहे. वेदश्री विनय दळी यांनी मराठी मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठीवरील श्री स्वामी समर्थ या मालिकेत मालोजीराजेंच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
याशिवाय झी मराठीवर गाजलेली मालिका स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवार बाईंची भूमिका साकारली होती. सोनी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या सुंदर आमचे घर या मालिकेत वेदश्री दळी प्रणालीची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रणाली ही सोशिक सूनबाई असून ती सुभद्रा सासूची बाजू घेताना पाहायला मिळते. या मालिके खेरीज अरे सोडा बाई बाटली या चित्रपटात देखील वेदश्री यांनी अभिनय साकारला होता.