कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसच्या शोला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र तरीही या शोने राखीला आमंत्रित करून शोचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न केला. हा शो संपायला आता अवघे जाही आठवडेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लवकरच दोन नव्या मालिका या वाहिनीवर दाखल केल्या जात आहेत. येत्या ९ जानेवारी पासून रात्री ९ वाजता रमा राघव ही नवी मालिका, तर रात्री १० वाजता पिरतीचा वणवा उरी पेटला ही नवी मालिका प्रसारित केली जाणार आहे. रमा राघव ही मालिका कन्नड मालिकेचा रिमेक आहे.
पैंजेवर जग जिंकणारी, मनाला पटेल तेच करणारी, बोल्ड अँड ब्युटीफुल रमा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत रमाच्या भूमिकेत ऐश्वर्या शेट्ये झळकणार आहे. तर सई रानडे, शीतल क्षीरसागर यांच्याही त्यात महत्वाच्या भूमिका असणार आहेत. ऐश्वर्या शेट्ये हिने काही महिन्यांपूर्वी फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून काढता पाय घेतला होता. ऑलमोस्ट सुफळ संपुर्ण आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून सहाय्यक भूमिका साकारली. कलर्स मराठीने तिला आपल्या नवीन मालिकेतून प्रमुख भूमिका साकारण्याची संधी दिली आहे. त्यामुळे ऐश्वर्यासाठी ही भूमिका तेवढीच खास ठरणार आहे. या मालिकेसोबतच पिरतीचा वणवा उरी पेटला ही नवी मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहे.
अभिनेत्री कांची शिंदे या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आपल्या गावातील मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून वाटेल तो पर्याय स्वीकारणाऱ्या सावीची ही गोष्ट आहे. कांची शिंदे ही अभिनेत्री तसेच लावणी नृत्यांगना आहे. ललीतकला केंद्र येथे कांची नवख्या कलाकारांना लावणी नृत्याचे धडे देते. तसेच अनेक मंचावर तिने नृत्य कलेचे दिग्दर्शन केलेले आहे. पिरतीचा वणवा उरी पेटला मालिकेतून प्रथमच ती छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. दोन्ही मालिकेच्या नायकबाबत अजूनही वाहिनीने खुलासा केला नसला तरी, या भूमिकेत कोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेतील कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.