झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवत आहे. मालिकेतील ट्विस्ट अँड टर्न्समुळे ही मालिका अधिक रंजक होत आहे. नुकतेच इंद्राणीने पद्माकर राज्याध्यक्ष यांना दरीत लोटून दिले. इंद्राणी ज्या कारणासाठी राज्याध्यक्ष कुटुंबात आली होती ते काम तिने केले आहे. पद्माकरने आपल्या आईला फसवले आणि याचाच बदला घेण्यासाठी ती इथे दाखल झाली होती. पण आता पद्मजा आजीला तिचं हे रूप समोर आल्याने त्यांनी इंद्राणीच्या कानाखाली लगावली आहे.
पद्माकरने इंद्राणीच्या आईलाच नाही तर आपल्यालाही फसवलं म्हणून त्या आता आपल्या खोलीत जाऊन रडत आहेत. मालिकेत पद्मजा आजीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली आहे. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. मालिकेत पद्मजा आजीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रजनी वेलणकर यांनी साकारलेली आहे. रजनी वेलणकर यांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. चौकट राजा, बिनधास्त, त्रिभंग, मधुचंद्राची रात्र अशा गाजलेल्या चित्रपटात रजनी वेलणकर यांनी छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. कॉलेजमध्ये असतानाच रजनी यांचे प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्याशी लग्न झाले होते. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना घर संसाराची जबाबदारी सांभाळली.
शिक्षिकेची नोकरी सांभाळत त्यांनी अभिनयाची आवड जोपासली होती. तर प्रदीप वेलणकर हे सुरुवातीला एअर इंडिया मध्ये काम करत होते. वेळ मिळेल तसे ते अभिनय क्षेत्रातही वावरत होते पण कालांतराने त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्ण वेळ देण्याचे ठरवले. तर रजनी वेलणकर यांची शिक्षिका आणि अभिनेत्री ही तारेवरची कसरत करताना त्यांना प्रदीपजींची मोलाची साथ मिळाली. गौरी, मीरा आणि मधुरा ही त्यांची तीन अपत्ये. यापैकी मधुरा आणि मीरा यांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात तसेच दिग्दर्शन क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. मिराने बटरफ्लाय या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात वेलणकर कुटुंबाला अभिनयाची संधी मिळाली आहे.