कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेला रंजक वळण आलं आहे. मालिकेत जादूच्या एन्ट्रीमुळे ढाले पाटील घरात दादासाहेब आणि राजश्रीची पोलखोल उघडली जाणार अशी त्यांना भीती वाटत आहे. जादू नुकतीच राजश्रीची चोरी पकडतो, त्यामुळे दादासाहेब जादूवर चिडतात. तर तिकडे सुजीत आणि मोनाचा साखरपुडा होणार असल्याने या सोहळ्याची लगबग मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत जादूचा बिनधास्तपणा प्रेक्षकांना भावला आहे. आज जादूची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात. संजीवनीला त्रास देणारा हा चिमुरडा जादू साकारला आहे आयुष उलगड्डे या बालकलाकाराने.
आयुष हा मूळचा कोल्हापूरचा. शालेय शिक्षणासोबतच आयुष मराठी मालिकांमधून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे. विशाल निकमची मुख्य भूमिका असलेल्या दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेतून आयुष झळकला होता. भूक या शॉर्टफिल्ममध्ये आयुष मुख्य भूमिकेत झळकला होता. भूक लागल्यावर काय बरोबर काय चूक याची जाणीव राहत नाही याच अनुषंगाने भूक ही शॉर्टफिल्म बनवण्यात आली. यात आयुषणे निभावलेल्या भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. संत गजानन शेगावीचे या सन मराठीवरील मालिकेत आयुषणे खुर्ड्याची भूमिका साकारली. मालिका, शॉर्टफिल्म असा त्याचा प्रवास सुरु असताना त्याने नृत्याची आवड देखील जोपासली आहे.
अभिनयासोबतच आयुषचे नृत्य देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेतील त्याचा सहज वावर प्रेक्षकांना चांगला आवडला आहे. दया भाईच्या तावडीतून सुटून आलेला हा जादू संजीवनी आणि रणजितची मनं जिंकून घेत आहे. त्यात भर म्हणजे बेबी मावशींची जादूच्या बाबतची काळजी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. दया जादूच्या शोधात असून तो दयाला पोलिसांच्या तावडीत पकडून देणार का हे येत्या काही भागात पाहायला मिळेल. तूर्तास मालिकेतून जादूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागल्याने मालिकेला रंजक वळण आले आहे. जादूच्या भूमिकेसाठी आयुष उलगड्डे ह्या बाल कलाकाराला मनपूर्वक शुभेच्छा.