आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री राधा सागर हिचे डोहाळजेवण साजरे करण्यात आले आहे. या खास सोहळ्यासाठी राधा सागर हिने हातावर आकर्षक मेहेंदी सजवली होती. या सोहळ्याला राधाच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. अशा सोहळ्याचे वैशिष्ट्य असे असते की पेढा किंवा बर्फी होणाऱ्या आई वडिलांना झाकून ठेवलेल्या बर्फी आणि पेढयातून एक गोष्ट निवडावी लागत असते. पेढा असेल तर मुलगा आणि बर्फी निघाली तर मुलगी होईल असे एक पारंपरिक पद्धतीने मजेशीर खेळ खेळले जातात.
यातून होणाऱ्या आईवडिलांना एक समाधान मिळते. पण राधाच्या डोहाळेजेवणात मात्र एक अनोखी पद्धत वापरली गेलेली पाहायला मिळाली. राधा सागर आणि तीच्या नवऱ्यासमोर दोन भले मोठे देवळाच्या रुपातील आखीव रेखीव बॉक्स ठेवण्यात आले. त्यातील एक गोष्ट त्यांना निवडण्यास सांगितली. तेव्हा त्यातून रखुमाईचे दर्शन झाले यावरून राधा सागरला रखुमाई होणार अशी धारणा मानली गेली. त्याचवेळी दुसऱ्या बॉक्सला उघडण्यात आले तेव्हा विठ्ठलाचे दर्शन झाले. राधाला मुलगी होणार हे भाकीत समोर येताच उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. राधाच्या डोहाळे जेवणातला हा अनोखा उपक्रम सगळ्यांनाच विशेष भावला. त्यामुळे भविष्यात अशा कार्यक्रमावेळी नवनवीन युक्त्या वापरल्या जातील यात शंका नाही.
सध्या राधाच्या डोहाळे जेवणाचे हे क्षण तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून तो व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. राधा सागर ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सृष्टीशी जोडली गेलेली आहे. बहुतेकदा तिने मालिकांमधून विरोधी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. एक मोहोर अबोल, कन्यादान, ठाकरे, मलाल अशा चित्रपट मालिकेतून राधाने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अभिनय आणि आईपण या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेऊन राधा आईपण अनुभवत आहे. कुटुंबालाही वेळ द्यायला हवा या विचाराने तिने खूप दिवसांपूर्वी मालिकेतून काढता पाय घेतला होता. डोहाळेजेवणाच्या या अनोख्या गोष्टीमुळे राधाला सिने आणि मालिका सृष्टीतील कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.