पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील पाचगणीजवळ असलेल्या भिलार गावात पुस्तकप्रेमींसाठी अभिनव संकल्पना मांडली आहे. भिलार हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले छोटेसे गाव. मराठी साहित्याची अवीट गोडी आणि गावकऱ्यांची मराठमोळ्या आदर आतिथ्याची चव तसेच लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचे खऱ्या अर्थाने पुनर्जीवित करणारं गाव ठरले आहे. येथे पुस्तक प्रेमींसाठी तब्ब्ल १५००० पुस्तकांचा अद्भूत खजिना वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. कल्पना तशी साधी आहे पण अनोखी आहे. संपूर्ण भारतभरातील हे एकमेव पुस्तकांचे गाव म्हणून आळखले जात आहे. कथा, कादंबरी, कविता, चरित्र आत्मचरित्र अशा रूढ साहित्य प्रकारांसोबतच.
विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कलांविषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग पर्यटन पर्यावरण, दिवाळी अंक. तसेच लोकसाहित्य, मराठी भाषा व संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालीन इतिहास अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांची येथील घरांत मेजवानी मिळते. इथे या, पुस्तके हाताळा, चाळा, वाचा ते देखील अगदी मोफत. या पुस्तकांची व्यवस्था त्यांच्या साहित्य प्रकारानुसार गावातील वेगवेगळ्या २५ ठिकाणी केली आहे. प्रत्येक ठिकाणी अत्यंत कल्पकतेने पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक घरात सुमारे ३०० ते ८०० अशा संख्येने पुस्तके ठेवण्यात आल्याने घरांचे ग्रंथालयात रुपांतर करण्यात आले. गावाचा स्वातंत्र्य चळवळीतील प्रत्यक्ष सहभाग, समृद्ध ऐतिहासिक आणि सामाजिक अशी पार्श्वभूमी आहे.
तसेच स्वच्छतेचा आग्रह, पर्यटक निवासाची व्यवस्था, शासकीय योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार. या सर्व घटकांचा विचार करून शासनातर्फे महाबळेश्वर मधील भिलार गावाची निवड करण्यात आली होती. धबधबे, घनदाट वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड व स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा अनुभव देणारं टुमदार भिलार. चोखंदळ पुणेकर मुंबई पुणे बेंगळुरु महामार्गावरील सुरुर फाटा मार्गे पाचगणी ते भिलार असे पोहचू शकतात. तर रसिक मुंबईकर गोवा महामार्गावरील पोलादपूर महाबळेश्वर मार्गे भिलार येथे येऊन अनुभव घेऊ शकतात. प्रकल्पातील काही सहभागी घरांमध्ये आणि गावात इतरत्रही निवास व भोजनाची सशुल्क व्यवस्था उपलब्ध होते.