पुष्पा द राईज हा चित्रपट अल्पावधीतच तुफान हिट ठरला. पुष्पा चित्रपट हिंदी मधून डब करण्यात आला. अभिनेता श्रेयस तळपदेसह अजून काही मराठी कलाकारांनी या चित्रपटातील महत्वाच्या पात्रांना आपला आवाज दिला आहे. श्रेयस तळपदेने पुष्पाच्या मुख्य भूमिकेला आवाज दिला. त्याचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी खूपच प्रभावी ठरला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. एवढेच नाही तर श्रेयसच्या दमदार आवाजामुळेच पुष्पा चित्रपट हिंदी मध्ये गाजला अशी चाहत्यांनी भूमिका मांडली आहे. या चित्रपटात रश्मीका मादण्णाने साकारलेल्या श्रीवल्लीच्या भूमिकेला गायिका स्मिता मल्होत्रा हिने आवाज दिला आहे.
स्मिता मल्होत्रा ही डबिंग आर्टिस्ट असून तिने याअगोदर अनेक दाक्षिणात्य चित्रपटासाठी डबिंग केलं आहे. पुष्पराज आणि श्रीवल्ली ही चित्रपटातली प्रमुख पात्र आहेत. पुष्पाच्या मित्राच्या भूमिकेला अभिनेता साहिल वैद्य याने आवाज दिला आहे. साहिल वैद्य हा बॉलिवूड चित्रपट सृष्टीत स्वताची ओळख निर्माण करत आहे. शेरशाह या चित्रपटात तो मुख्य नायकाच्या मित्राच्या भूमिकेत झळकला होता. मंगलम श्रीनूची प्रभावी भूमिका दाक्षिणात्य अभिनेता सुनीलने साकारली आहे. श्रीनूची ही भूमिका काहीशी विरोधी भूमिका दर्शवणारी आहे. या भूमिकेला मराठी सृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याने आपला आवाज दिला आहे. अभिनेते उदय सबनीस हे अभिनयासोबतच डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात.
अभिनेते उदय सबनीस यांनीच श्रीनूच्या भूमिकेला आपला आवाज दिला आहे. एवढेच नाही तर अगदी प्रसिद्ध कार्टून कॅरॅक्टर्सना त्यांनी आपला आवाज देऊन त्या विशिष्ट भूमिका त्यांनी आपल्या आवाजाने रंगवल्या आहेत. ऍनिमेटेड फिल्म्स असो वा टॉलीवूड किंवा हॉलिवूड चित्रपट अशा अनेक चित्रपटातील महत्वाच्या भूमिकांना त्यांनी आपल्या आवाजात डब केलं आहे. आजवर जवळपास हजार हुन अधिक कॅरॅक्टर्सना त्यांनी आपल्या आवाजात मंत्रमुग्ध केलं असून डबिंग आर्टिस्ट म्हणून त्यांचा हातखंडाच बनला आहे. संकेत म्हात्रे हा मराठमोळा कलाकार देखील डबिंग आर्टिस्ट म्हणून सर्वांना परिचित आहे. अनेक हॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांना हिंदी व्हर्जनसाठी त्याने आपला आवाज दिला आहे.
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेला देखील संकेतनेच डब करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आणि संकेतचा आवाज अल्लू अर्जुनला सूट होतो असेही अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे श्रेयसची पुष्पा चित्रपटासाठी वर्णी लागली त्यावेळी सुरुवातीला अनेकांनी नाराजी दर्शवली होती. श्रेयासचा आवाज अल्लू अर्जुनला सूट होणार नाही असेच मत अनेकांचे होते. मात्र जेव्हा चित्रपट प्रत्यक्षात पाहायला मिळाला त्यावेळी श्रेयसच्या आवाजाला तुफान लोकप्रियता मिळू लागली. अल्लू अर्जुनने देखील श्रेयसचे खूप कौतुक केले होते. आणि लवकरच त्याची भेट घेणार आहे असेही म्हटले होते.