मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री याच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. एका घरकाम करणाऱ्या महिलेने पुष्करच्या घरातून जवळपास १० लाख २७ हजार रुपयांची चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १० लाख २७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि १.२० लाखांची रोख रक्कम पुष्करच्या घरातून लंपास झाली असल्याचे त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आहे होते. याप्रकरणी पुष्कर श्रोत्रीने घरकाम करणाऱ्या उषा गांगुर्डे आणि तिचा पती भानुदास गांगुर्डे या दोघा जणांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुष्कर श्रोत्री हा विलेपार्ले पूर्व येथे वास्तव्यास आहे. त्याच्याकडे घरकाम करण्यासाठी आणि वडिलांची काळजी घेण्यासाठी नोकर होते. त्यापैकी उषा गांगुर्डे वय वर्षे ४१ यांनी सुमारे ५ ते ६ महिने पुष्करच्या घरी सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत काम केले होते. पण या पाच ते सहा महिन्यांच्या कालावधीत कुठलीही खबर लागू न देता उषाने लाखोंची रक्कम लंपास केली असल्याचे आता उघडकीस आले आहे. केवळ रोख रक्कमच नाही तर लाखोंच्या किमतीचे दागिने तिने लंपास करून आपले काम चालू ठेवले होते. पण ही चोरीची घटना पुष्करच्या पत्नीच्या लक्षात आली आणि ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. २२ ऑक्टोबर रोजी पुष्करची पत्नी प्रांजल हिला उषा गांगुर्डे हिच्यावर संशय आला होता. १.२० लाख रोख रक्कम, ६० हजारांचे विदेशी चलन चोरिला गेले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते.
तपासादरम्यान उषाने ते पैसे चोरल्याचे कबूल केले आणि पती भानुदास गांगुर्डे याच्याकडे दिले असल्याचे म्हटले. तिच्या पतीनेही चोरीचे पैसे मिळाल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी चोरीची दुसरी घटना उघडकीस आली/ जेव्हा प्रांजलने कपाटातून सोन्याचे दागिने काढले आणि त्यात काहीतरी असामान्य असल्याचे तिच्या लक्षात आले. ते सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या दागिन्यांच्या दुकानात नेले असता ते दागिने बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तपासादरम्यान उषा गांगुर्डे यांनी खरे दागिने चोरून त्याऐवजी त्याच्याही मिळतेजुळते बनावट दागिने आणल्याचे उघड झाले. त्यामुळे पुष्कर श्रोत्री यांनी २६ ऑक्टोबर रोजी उषा आणि तिच्या पती भानुदास गांगुर्डे विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.