बालकलाकार ते मुख्य नायक अशा भूमिका निभावलेल्या पुष्कर जोग याच्या आईवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पी जोग क्लासेस या संस्थेने गेल्या काही दशकापासून शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावलं आहे. पुष्करची आई सुरेखा जोग या पुण्यातील प्रसिद्ध जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ट्रस्टच्या माध्यमातून ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र बनवले जात होते. अशी प्रमाणपत्र तयार करून २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या फी मधला परतावा शिक्षण विभागाकडून मिळवण्याचा प्रकार चालू होता.

हा प्रकार विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी नुकताच उघडकीस आणला आहे. याप्रकरणी सुरेखा जोग यांच्यासह आणखी तीन जनांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २०१९ ते २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत ही फसवणूक घडून आली. बनावट प्रमाणपत्र तयार करून विद्यार्थ्यांचे शुल्क लाटण्याचा प्रकार या प्रकरणातून करण्यात येत होता. उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यताप्राप्त प्रमाणपत्राच्या बदल्यात २५ हजार रुपये मिळायचे. २०२० साली ११ शाळांसाठी त्यांना जवळपास २ लाख ७५ हजार रुपये देण्यात आले होते. अशी प्राथमिक तपासात माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी आणखी कोणकोणते खुलासे होतात हे तपासाअंती समोर येईल.

मार्च २०१९ ते २०२० या कालावधीत जोग एज्युकेशन ट्रस्टमधून स्वमान्य प्रमाणपत्र बनवली गेली. त्यावर खोट्या सह्या आणि जावक क्रमांकाची नोंद करण्यात आली होती. ही सर्व कागदपत्रे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांकडे मान्यतेसाठी देण्यात आली होती. या प्रकरणातून आरटीई अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे २५ टक्के शुल्क लाटण्याचा प्रयत्न केला जात होता. विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी हा प्रकार उघडकीस आणला आणि सुरेख जोग, उपशिक्षण अधिकारी किशोर पवार, हेमंत सावळकर, वरिष्ठ सहाय्यक गौतम शेवडे या चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तपास चालू आहे असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील खेडेकर यांनी सांगितले आहे.