दोन दिवसांपासून अभिनेता पुष्कर जोग सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणचे काम नेमून दिले असताना त्यांनी पुष्करला त्याची जात विचारली होती. तेव्हा भडकलेल्या पुष्करने मला जात विचारणाऱ्याच्या कानफटात मारली असती आणि त्या महिला कर्मचारी नसत्या तर दोन लाथा घालून हाकलून दिले असते असे त्याने एक वक्तव्य केले होते. यावरून पुष्कर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करत होता. मुसाफिरा या चित्रपटाच्या त्याच्या पोस्टवर अशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया त्याला मिळत होत्या. अभिनेते किरण माने यांनीही पुष्करला चांगलेच धारेवर धरत आव्हान देताना म्हटले की हेच वक्तव्य तू राजकीय व्यक्तीबद्दल करून दाखव.
मी तुला चॅलेंज देतो, ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल, खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्याकडून चार लाथा खायच्या. बोल, आहे दम तुझ्या पार्श्वभागात? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय? आपलं काम इमानेइतबारे करणार्या कर्मचार्यांवर कसला माज दाखवतो तू? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. असे म्हणत किरण माने यांनी पुष्करच्या वक्तव्याला आव्हान दिले होते.
या सगळ्या विरोधाचा आणि टीकेचा परिणाम म्हणून की काय पुष्करने सगळ्यांची आणि बीएमसी कर्मचाऱ्यांची जाहीरपणे माफी मागितलेली आहे. हा माफीनामा देताना पुष्कर म्हणतो की, मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी. असे म्हणत पुष्करने सोशल मीडियावर आपला जाहीर माफीनामा दिला आहे.