अभिनेत्री पूर्णिमा भावे यांनी लहान असल्यापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली होती. पौर्णिमेचा जन्म म्हणून आईवडिलांनी त्यांचे नाव पूर्णिमा ठेवले होते. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमातून वावरताना त्यांनी काही मालिकेसाठी दिग्दर्शन सुद्धा केले होते. एकत्रित काम करत असताना पूर्णिमा भावे आणि स्मिता तळवलकर या एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. पूर्णिमा तळवलकरांची सून व्हावी अशी स्मिता तळवलकर यांची मनापासून इच्छा होती. पण स्मिता तळवलकर यांच्या मुलाचे सुलेखा सोबत अगोदरच लग्न झाले होते.

म्हणून मग त्यांनी त्यांच्या पुतण्यासाठी पूर्णिमाचे स्थळ सुचवले होते. २००२ साली रोहित तळवलकर सोबत पूर्णिमाचे लग्न झाले तेव्हापासून पूर्णिमा तळवलकर नावाने ओळखल्या जाऊ लागल्या . लग्नानंतर चार वर्षे ब्रेक घेतल्यानंतर त्या पुन्हा त्याच उत्साहाने मराठी सृष्टीत दाखल झाल्या. पूर्णिमाच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची धाकटी बहीण पल्लवी भावे हिनेही या क्षेत्रात आपले नशीब आजमावले. खरं तर या दोघी सख्या बहिणी आहेत यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाही. कारण दोघींच्या दिसण्यात खूप असल्याने अनेकांना हा प्रश्न पडत असतो. अशाच एका मुलाखतीत पूर्णिमा यांनी त्यांच्या बहिणीचा लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता.

त्या म्हणाल्या होत्या की, पल्लवी वडील आणि आज्जीसारखी दिसते आणि मी माझ्या आईवर गेले. पल्लवी लहानपणी खूप चिडायची, ती नेहमी म्हणायची की हीच का एवढी सुंदर, मीच का काळी? ही कशी गोरी? तेव्हा माझी आई तिची समजूत घालायची. तिचे केस बघ कसे आहेत आणि तुझे बघ किती छान कुरळे आहेत. तिचं नाक बघ किती मोठं आहे आणि तुझं बघ किती छान आहे. पण नंतर नंतर पल्लवीने तिच्या दिसण्यात खूप बदल केला. तिचा चेहरा खूप रेखीव आहे. आता तर ती माझ्यापेक्षाही खूप सुंदर दिसते. आमच्यातील बहिणी बहिणीचं बॉंडिंग खूप छान आहे. खूप वर्षांपूर्वी आम्ही दोघींनी दुहेरी या मालिकेतून एकत्रित काम केलं होतं.
मालिकेत मी विरोधी भूमिकेत होते, तर पल्लवीने सकारात्मक भूमिका साकारली होती. माझी मनापासून इच्छा आहे की मला तिच्यासोबत पुन्हा एकदा काम करायचं आहे. भविष्यात ही संधी मला मिळू दे असं मला मनापासून वाटतं. पल्लवी भावे या दिग्दर्शक केदार वैद्य सोबत विवाहबद्ध झाल्यानंतर पल्लवी वैद्य नावाने ओळखू लागल्या. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी पुतळा मतोश्रींची भूमिका सुंदर वठवली होती. सध्या त्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत क्षमा म्हणजेच स्वराच्या काकुची भूमिका साकारत आहेत.