सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेची निर्माती तसेच प्रसिद्ध अभिनेत्री मनवा नाईक हिला नुकताच एक धक्कादायक अनुभव आला आहे. अनेक कलाकार मंडळी ही रात्रीच्या प्रवासावेळी ओला, उबरचा पर्याय शोधत असतात. मनवाने देखील उशिरा पर्यंत काम आटोपल्यानंतर घरी जाण्यासाठी हा पर्याय निवडला. बिकेसी येथून रात्री ८.१५ च्या दरम्यान मनवाने उबर बुक केली होती. गाडीत बसल्यानंतर वाहन चालक गाडी चालवत असताना फोनवर बोलत होता. मनवाने त्याला फोनवर बोलण्यास मनाई केली, परंतु चालकाने तिला काहीच प्रतिसाद दिला नाही. पूढे गेल्यावर त्या चालकाने फोनवर बोलता बोलता सिग्नल देखील मोडला.
मात्र समोरच उभ्या असलेल्या ट्राफिक पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले आणि गाडीचा फोटो काढून घेतला. उबर चालक पोलिसांशी हुज्जत घालू लागला. पोलिसांनी अगोदरच गाडीचा फोटो क्लिक करून घेतल्याने मनवाने मध्यस्ती करत त्याला जाऊ द्या असे पोलिसांना सांगितले. त्यावरून ड्रायव्हरला राग आला आणि ‘तू भरेगी क्या ५०० रुपये? ‘ असे तिला चिडुन म्हणाला. गाडी पुढे नेल्यावर रुक तेरेको दिखाता हुं म्हणत ड्रायव्हर मनवाला धमकी देऊ लागला. मनवाने त्याला गाडी पोलीस चौकीत नेण्यास सांगितली. जिओ गार्डनजवळ एका अंधाऱ्या ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांतील वाद वाढतच गेला, त्याने पुन्हा वेगाने गाडी चालवली.
बिकेसी कुर्ला पुलावर त्याने पुन्हा उबर थांबवण्याचा प्रयत्न केला, क्या करेंगे, रुक दिखाता हू असे म्हटल्यावर मनवाने उबर सेफ्टीला फोन केला. ग्राहक सेवा कर्मचारी कॉलवर असताना. उबर चालकाने कुनाभट्टी रोडवरून प्रियदर्शनी पार्कपर्यंत धाव घेतली. त्यावेळी मनवाने ड्रायव्हरला थांबण्यास सांगितले, त्याने नाही ऐकले आणि तो कोणाला तरी हाक मारू लागला. हे पाहून मनवा ओरडायला लागली. २ दुचाकीस्वार आणि एका रिक्षावाला तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी गाडी जवळ येऊन मनवाला उबरमधून बाहेर काढले. ‘मी आता सुरक्षित आहे पण नक्कीच घाबरलेली आहे.’ असे म्हणत मनवाने ही घटना शेअर केली आहे.
या घटनेच्या माहितीसोबत मनवाने उबर चालकाचा फोटो आणि गाडीचा नंबर देखील फेसबुकवर शेअर केला आहे. जेणेकरून अशा चालकांपासून इतर जण सतर्क राहतील. मनवाने या घटनेत विश्वास नांगरे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना देखील लक्ष्य घालण्याची मागणी केली आहे. तिच्या या मागणीवर विश्वास नांगरे पाटील यांनी त्या उबर चालकावर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ‘आम्ही या गंभीर घटनेची दखल घेतली असून डीसीपी झोन ८ यावर काम करत आहोत. दोषींवर लवकरात लवकर गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.