प्रिया बापट ही मराठी सृष्टीतील आघाडीची नायिका मानली जाते. सुरुवातीच्या काळात सहाय्यक भूमिकेतून दिसणारी प्रिया पुढे जाऊन प्रमुख भूमिकेत झळकू लागली. अभिनयाचे बाळकडू तिला ज्येष्ठ अभिनेत्री विद्याताई पटवर्धन यांच्याकडूनच मिळालं होतं. बालमोहन शाळेतून शालेय शिक्षण घेत असताना प्रिया बापट हिने शिक्षिका विद्याताई पटवर्धन यांच्या मदतीने बालनाट्य सृष्टीत पदार्पण केले होते. इथूनच तिच्या अभिनयाचा प्रवास घडत गेला. नाटक, मालिका हा प्रवास सुरु ठेवत तिने थेट हिंदी चित्रपटापर्यंत मजल मारलेली पाहायला मिळाली. नुकताच सिटी ऑफ ड्रीम्स या सिरीजचा तिसरा सिजन प्रेक्षकांच्या भेटीला आला.
प्रिया बापटने या सिझन मध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. प्रियाच्या या भूमिकेचं सर्वत्र मोठं कौतुकही झालं. काही दिवसांपूर्वी प्रियाने एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना एक किस्सा सांगितला. एका करणामुळे प्रिया आणि तिच्या बहिणीला आईकडून शिक्षा सुद्धा मिळाली होती. हा किस्सा सांगताना प्रिया बापट म्हणते की, आम्ही दादरला राहायचो, दादरच्या अनेक आठवणी आहेत. आमच्या घराच्या समोरच एक चौक होता, त्याठिकाणी आम्ही दोघी बहिणी खेळायला जायचो. आमच्या आजूबाजूची सगळी मुलं याच ठिकाणी खेळायला यायची. संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आम्ही तिथे खेळायचो, हा आईने घालून दिलेला एक नियमच होता. साडेसात वाजले की लगेचच घरी जाऊन हातपाय धुवायचो आणि देवापुढे प्रार्थना म्हणायची.
त्यानंतर ८ वाजता आम्ही दोघी जेवायचो, हे आमचं नित्याचच झालं होतं. पण एके दिवशी मी आणि माझी बहिण बॅडमिंटन खेळत होतो. या खेळात आम्ही इतके रमून गेलो होतो की साडेसात कधी वाजले याचीही आम्हाला जाणीव झाली नाही. आईने हाक मारली पण त्यावेळी अजून पाच मिनिटं असे म्हणत रात्रीचे आठ वाजले. त्यानंतर मात्र आता आपलं काही खरं नाही याची जाणीव आम्हाला झाली होती. आम्ही घरी गेलो तर आईने दार लावून घेतलं होतं आणि आम्हाला बाहेरच ठेवलं होतं. आता तुम्हाला जेवायला मिळणार नाही अशीच शिक्षा आईने दिली होती. आम्ही दोघी खूप रडकुंडीला आलो होतो तेव्हा आईने आमच्याकडे पाहून पुन्हा घरात घेतलं होतं.