स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव या कलाकारांनी मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. प्रेमाची गोष्ट ही तेजश्री प्रधानचीच मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिले गेले. तेव्हा या मालिकेचा टीआरपी निश्चितच वाढणार असे बोलले जात होते. पण मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी आजही ठरलं तर मग ह्या मालिकेने आपले अव्वल स्थान टिकवून ठेवले आहे. प्रेमाची गोष्ट या मालिकेत प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळत आहे.
सागर आणि सावनीच्या नात्यात दुरावा आल्याने सागर आता आपल्या लेकीचा एकट्याने सांभाळ करत आहे. अशातच त्याची मुक्तासोबत पहिली भेट घडून आली. पण पहिल्याच भेटीत सागर खूप उर्मट माणूस आहे हे तिला समजले. सावनी ही सागरची पहिली पत्नी आहे. सागर किती गहाळ आहे तो मुलीची काळजी घेत नाही, आपल्या मुलीची कस्टडी मिळावी म्हणून सावनीने दावा केला आहे. तर इकडे सागर आणि मुक्ताची हळूहळू मैत्री होणार आहे. एकीकडे मालिकेचे कथानक आवडले असले तरी प्रेक्षकांनी मात्र या मालिकेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज हंचनाळे हा वयाने खूप कमी वाटतो त्यामानाने तेजश्री आणि अपूर्वा ह्या दोघीही नायिका गेली बरीच वर्षे मराठी सृष्टीत कार्यरत आहेत. त्यामुळे नायक नायिकेच्या वयातील फरकामुळे मालिका ट्रोल होत आहे.
राज हंचनाळे नायक म्हणून दोघींनाही शोभत नाही अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिली जात आहे. या ट्रोलिंगवर अपूर्वा नेमळेकरने नुकतेच एक उत्तर दिले आहे. अपूर्वा म्हणते की, आम्ही अशा कमेंट्स वाचल्या आहेत, लोकांकडूनही अशा गोष्टी ऐकत आहोत. लोकांना वाटतं की आम्ही दोघी राज पेक्षा वयाने खूप मोठ्या दिसतो, पण तसं मुळीच नाहीये. आम्ही तिघे एकाच वयाचे आहोत, आमच्या तिघांचंही वय सारखंच आहे आणि तिघेही त्याच एनर्जीने काम करत असतो. मला असा विश्वास आहे की, भविष्यात या प्रेक्षकांचं मतं नक्की बदलेल. दरम्यान लवकरच या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. हे पात्र सावनीला आपल्या जाळ्यात ओढताना दिसणार आहे. अभिनेता यश प्रधान ही भूमिका साकारत आहे. यशच्या एंट्रीमुळे या मालिकेत आता प्रेक्षकांना प्रेमाचा चौकोन सुद्धा पाहायला मिळणार आहे.