मराठी सृष्टीतील अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, निवेदिता सराफ, अपूर्वा नेमळेकर आणि आरती वडगबाळकर या कलाकार मंडळींनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे. याच क्षेत्रात गेल्या ७ वर्षांपासून पाय रोवून असलेला अथर्व चव्हाण याने देखील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विठू माऊली, जाऊ नको दूर बाबा, तू माझा सांगाती अशा मालिकांमधून सहाय्यक भूमिका साकारणारा अथर्व चव्हाण व्यवसाय क्षेत्रात देखील तितकाच यशस्वी ठरला आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी सुरू केलेल्या या यशाच्या प्रवासात मात्र त्याला अनेक अडथळे आले. अनेकांकडून खूप चांगले अनुभव मिळाले तर कधी वाईट अनुभव देखील आले.
अनेक चढ उतार सहन करत त्याने यशाचा एक एक टप्पा पार करत व्यवसायाची भरभराट केली आहे. ७ वर्षांपूर्वी प्रतिबिंब या नावाने अथर्वने कपड्यांचा ब्रँड सुरू केला. पुढे परंपरा या अंतर्गत त्याने साड्या डिझाइन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर प्रतिपदा क्लॉथींग या नावावर त्याने शिक्कामोर्तब करत व्यवसायाची भरभराट केली. डिझायनर आणि पारंपरिक साड्या, पर्स आणि पारंपरिक पध्दतीने पुरुषांचे आऊटफिट्स डिझाइन केलेल्या त्याच्या ब्रँडची भुरळ मराठी सेलिब्रिटींना देखील पडलेली आहे. गिरीजा प्रभू, संकर्षण कऱ्हाडे, साक्षी महेश, अक्षया नाईक या सेलिब्रिटीनी मालिकांमधून अथर्वने डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान केले आहेत. याशिवाय अथर्वने दोन कटिंग २ या शॉर्टफिल्मसाठी कॉस्टयूम डिझायनर म्हणून काम केले आहे.
अभिनया सोबतच अथर्वने सूर राहू दे, मुंबई पोलीस या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. अथर्व चव्हाण ने डी जी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच अथर्वला अभिनयाची आवड होती. त्याने माझी शाळा या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. नाट्य तसेच एकांकिका स्पर्धामधून त्याच्या अभिनयाला वाव मिळत गेला. कॉलेज मधून शिक्षण घेण्यासोबतच त्याने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. हे उपजत गुण त्याला त्याच्या वाडीलांकडूनच मिळाले असे म्हणायला हरकत नाही. कारण अथर्वचे वडील नंदू चव्हाण हे देखील व्यवसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
माऊंटन स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. नंदू चव्हाण हे ट्रेकर्सना लागणाऱ्या साहित्याची विक्री करतात. डोंगरा दरीत, गड किल्ल्यांवर किंवा अपघाताच्या ठिकाणी विविध रेस्क्यू टीम लोकांच्या मदतीसाठी मोफत सेवा पुरवत असतात. त्यांना लोकनिधीतून लागणारे साहित्य पुरवण्याचे काम नंदू चव्हाण करत आहेत. या योगदानाबद्दल नंदु चव्हाण यांना नुकतेच माता जननी फौंडेशन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.