आज रविवार ६ नोव्हेंबर रोजी प्रशांत दामले यांच्या नाट्य कारकिर्दीतील १२५०० वा नाट्यप्रयोग मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात सादर करण्यात आला. प्रशांत दामले यांचे कौतुक करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रशांत दामले यांच्यासोबत बॅक स्टेजला काम करणाऱ्या कलाकार मंडळींचा देखील सन्मान करण्यात आला. प्रशांत दामले यांचा हा विश्वविक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल गर्दी केली होती. नाट्यप्रेमी, नाट्य रसिकांनी आपल्या नाटकाला येऊन उपस्थिती लावल्याबद्दल आणि आजवर दिलेल्या निस्सीम प्रेमाबद्दल प्रशांत दामले यांनी या सर्वांचे मनापासून आभार मानले.
प्रशांत दामले यांच्या या विश्वविक्रम निमित्त अनेकांनी शुभेच्छा दिल्या. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एक खास प्रतिक्रिया दिली आहे. विक्रमाबद्दल शुभेच्छा देताना सचिन तेंडुलकर म्हणतो की, मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज त्यांचा १२,५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सचिनच्या या प्रतिक्रियेबद्दल प्रशांत दामले यांनी आभार मानले आहेत. सचिनच्या प्रतिक्रिये प्रमाणेच सध्या त्यांच्या पत्नी गौरी दामले यांची एक खास गोष्ट चर्चेत येत आहे. प्रशांत दामले यांना अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना सुधीर भट यांची मोलाची मदत मिळाली.
हौशी नाटक करत असताना १९८३ साली टूर टूर नाटकातून काम करण्याची नामी संधी मिळाली होती. त्याच वेळी बेस्टमध्ये नोकरी लागली. मग पुढे महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, बहुरुपी, चित्रपट सुरू झाले. बेस्टकडून वेळोवेळी सहकार्य मिळाले, तब्ब्ल ५ वर्षांची सुट्टीच मंजूर करून दिली. नाटकाची आवड आणि घरसंसार या द्विधामनस्थितीत असताना, एक निर्णय घ्यावा लागेल याची जाणीव त्यांना झाली. १९९२ मध्ये गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या पहिल्याच प्रयोग वेळी; आता आपण हेच काम करायचंय हे ठरवलं. पदरी दोन मुली असल्याने पत्नीशी विचार विनिमय केला आणि १०० टक्के नाटकच करायचं असा निर्णय मनाशी पक्का केला. आज प्रशांत दामले यांनी कारकीर्तीदला १२,५०० वा प्रयोग सादर करून विश्वविक्रम आपल्या नावे नोंदवलेला आहे.