ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावून गेले आहे. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला अष्टपैलू अभिनेता अशी त्यांनी ओळख मिळवली होती. आज दुपारी त्यांच्या अंत्यविधीसाठी मराठी सृष्टीतील नामवंत कलाकारांनी हजेरी लावून त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयवंत वाडकर, विजय पाटकर यांनी यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. प्रदीप पटवर्धन आणि विजय पाटकर हे कॉलेजपासूनचे मित्र. एकांकिका, नाट्यस्पर्धा करत या दोघांनी मराठी सृष्टीत पाऊल टाकलं. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही एकत्रित होतो अशी आठवण त्यांनी यावेळी काढली.
तर प्रशांत दामले यांनी देखील प्रदीप पटवर्धन यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. पट्या, प्रदीप पटवर्धन. मी आणि प्रदीप, आमची जोडी होती. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या. सिद्धार्थ कॉलेजची ५ वर्ष १९७८ ते १९८२ प्रायोगिक रंगभूमी आणि १ जानेवारी १९८५ ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण ४४ वर्षांची दोस्ती. या घानिष्ठ मैत्रीला आज पूर्ण विराम मिळाला. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती.
त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार. असे म्हणत प्रशांत दामले खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी प्रदीप पटवर्धन यांना देवाज्ञा झाली. प्रदीप पटवर्धन यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर शेअर केले जात आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने मराठी सृष्टीतील एक तारा निखळल्याची खंत व्यक्त केली जात आहे.