जास्तीचा टोल आकारल्यामुळे सर्वसामान्यांना कित्येकदा त्रास सहन करावा लागला आहे. आता तर फास्ट टॅगमुळे या गोष्टी सर्रास घडलेल्या पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वीच या बाबतीत अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने सोशल मीडियावर आवाज उठवला होता. पण त्यावर शासन काही ठोस पाऊलं उचलतील की नाही हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. पण हे फास्ट टॅग येण्याअगोदर टोल चुकवण्यासाठी कलाकार मंडळी त्यांच्या प्रसिद्धीचा योग्य तसा वापर करून घेत होते. अभिनेत्री अनिता दाते ही कित्येकदा टोल नाक्यावर तिच्या प्रसिद्धीचा उपयोग करून घेत होती.
अशातच पुष्कर श्रोत्री हा सुद्धा त्याच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेत होता. मात्र एके दिवशी प्रसाद ओक समोरच टोल नाक्यावर त्याचा अपमान झाला. पण ही गोष्ट तू कोणालाही सांगायची नाहीस अशी तंबीच त्याने त्यावेळी प्रसादला दिली होती. मात्र प्रसादने स्वतःच आता या गोष्टीचा उलगडा जगजाहीर केलेला पहायला मिळतो आहे. एकदा कोण होणार करोडपतीच्या मंचावर प्रसाद ओकने हजेरी लावली होती. त्यावेळी हास्यजत्राचे कलाकारही तिथे उपस्थित होते. प्रसादने हा किस्सा सांगताना म्हटले होते की, पुष्कर आणि मी एकत्र खूप प्रवास केलाय, करत असतो. त्याला एक सवय आहे की टोलनाका आला की गाडीची काच खाली करून मोठ्या आवाजात ‘घे रे मी ए रे’ असं तो म्हणतो.
टोल नाक्यावर मराठीच माणसं असतात त्यामुळे पुष्करकडे पाहिल्यानंतर अरे साहेब तुम्ही असे म्हणून ते टोल न घेताच गाडी जाऊन देत होते. एक दिवस आम्ही दहिसरचा टोलनाका क्रॉस करत होतो. त्याने सवयीप्रमाणे काच खाली केली आणि मी ए रे असं म्हणाला. त्या माणसाने पुष्करकडे पाहिलं आणि कोण आहे रे तू? असं जोरात ओरडून ओळखलं नसल्याचे दाखवले. प्रसादने एवढे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. पुढे प्रसाद सांगतो की, त्या माणसाने केलेल्या अपमानाचं पुष्करला तसूभरही वाईट वाटलं नाही. पण तो पटकन माझ्याकडे वळला आणि तुला आईची शपथ आहे हे तू कोणालाही सांगायचं नाहीस. आता पुष्करचा हा किस्सा प्रसादने एवढे दिवस मनात ठेवला होता. मात्र कोण होणार करोडपतीच्या मंचावर त्याने हा किस्सा जवळपास जगजाहीरच करून टाकला.